पुणे । पीएमपी बस डेपोंमधील भंगार साहित्यांत पावसाचे पाणी साचल्याने डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढली आहे. डेपोंमध्ये यापुढे डासोत्पत्ती आढळून आल्यावर डेपो मॅनेजरवर खटले दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. पालिकेने वारंवार सूचना देऊनही पीएमपी बस डेपोंमधील भंगार साहित्य काढून टाकलेले नाही. त्यामुळे त्यात पावसाचे पाणी साचत आहे. त्यामध्ये डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून शहरात डेंग्यूचा प्रसार वाढला आहे. आतापर्यंत ऑगस्टमध्ये 786 तर सप्टेंबरमध्ये 858 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून शहरात औषध फवारणीबरोबरच यापूर्वी डासोत्पत्ती ठिकाणे आढळलेल्या ठिकाणांची पुन्हा तपासणी करण्यात येत आहे. यात बहुतांश पीएमपी डेपोंमध्ये वारंवार डेंग्यूची डासोत्पत्ती ठिकाणे आढळून येत आहेत. पीएमपीच्या डेपोमध्ये दररोज भंगार निर्माण होते. भंगाराचा लिलाव होत नाही तो पर्यंत भंगार हलवता येत नसल्याने लाखो किलोचे भंगार डेपोमध्ये साचले आहे. या भंगारमध्ये पाणी साचून राहत आहे. आणि त्यामुळे डेंग्यूची उत्पत्ती स्थळे निर्माण होत आहे.
नोटीसा बजावणार
शहरातील डेंग्यूचा उद्रेक पाहता सवर्र् शासकीय कार्यालय तसेच महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालये व पालिकेच्या मुख्य विभागातील कार्यालयांंमध्ये डासोत्पत्तीची ठिकाणे आढळून आल्यास विविध विभागाशी चर्चा करून या विभाग प्रमुखांनाही नोटीस बजाविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.