… तर तळेगावची वाहतूक समस्या दूर होईल!

0

नगरपरिषद, लोकप्रतिनिधी, व नागरिक यांच्या सहकार्याची गरज

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी केले मत व्यक्त

तळेगाव : तळेगाव दाभाडे शहरात रोजच वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे तळेगावकरांना रोजच वाहतूक समस्येला सामोरे जावे लागते आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद, नगर परिषदेचे लोकप्रतिनिधी, व शहरातील स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे. या सर्वांनी सहकार्य तसेच नियमांचे पालन केले तरच तळेगावची वाहतूक समस्या दूर करण्यास वेळ लागणार नाही, असे मत देहूरोड व तळेगाव दाभाडेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी व्यक्त केले. वरीष्ठ पोलीस निरीक्षक पवार हे नुकतेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून नियुक्त झालेले आहेत. तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील वाहतूक समस्येवर योग्य तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधी व रस्ते सुरक्षा प्रमुखांची मंगळवारी तळेगाव दाभाडे नगर परिषद सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीस नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, पक्षनेते सुशील सैंदाणे, माजी उपानागाराध्य्क्ष सुनील शेळके, मुख्याधिकारी वैभव आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, नगरसेवक सुलोचना आवारे, अरुण भेगडे पाटील, अमोल शेटे, रोहित लांघे, सुनील कारंडे, कल्पना भोपळे, विभावरी दाभाडे, शोभा भेगडे, प्राची हेंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश हगवणे, अरुण भगवान भेगडे आदी उपस्थित होते.

नगर परिषदत मदत करेल

तळेगाव दाभाडे शहरातील वाहतुकीवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये यावेळी उपस्थितांमधून अनेक मान्यवरांनी वाहतूक समस्येच्या चर्चेत सहभाग घेतला. यामध्ये मुख्यत्वे काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक करणे, मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, गतीरोधक टाकणे, सम-विषम दिनांकाचे पार्किंग करणे, झेब्रा क्रसिंग करणे, तीनचाकी, चारचाकीद्वारे प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांचे कायमस्वरूपी वाहनतळ करणे, चौकामध्ये सिग्नल बसवणे आदी रस्ते आणि सुरक्षे संबंधित विषयांवर सखोल चर्चा झाली. लवकरात लवकर याबाबत अंमलबजावणी करण्यात येईल असे पवार यांनी सांगितले. तर आभार व्यक्त करताना नगराध्यक्षा जगनाडे यांनी आपणास लागणारे सर्व सहकार्य नगर पालिका करेल, असे मत व्यक्त केले.

वाहनांसाठी टोचण व्हॅन देतो

माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी सांगितले की, यावेळी उपस्थितांनी केलेल्या चर्चेमधून विविध सूचना मिळाल्या आहेत. त्यापैकी एक महत्वाची म्हणजे रस्त्यावर नो पार्किंग केलेल्या गाड्यांना उचलण्यासाठी, कारवाई केलेली व खूप दिवस एकाच ठिकाणी राहिलेली वाहने उचलण्यासाठी टोचण व्हॅनची आवश्यकता आहे. ती आयुक्तालयाकडून मागून घेण्यापेक्षा मी लागलीच पोलिसांना व्हॅन देतो. शेळके यांच्या तत्परतेबद्दल सर्व बैठकीमधून त्यांचे कौतुक करण्यात आले.