…तर तुरूंगात टाका मात्र कुठे चुकलोे ते सांगा ?

0

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पुन्हा विचारला सरकारला जाब ; खडका येथील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्र्यांवर टिकास्त्र

भुसावळ- पक्ष वाढवण्यासाठी लढलो, झटलो, लाठ्या-काठ्या काढल्या प्रसंगी तुरुंगाची हवा खाल्ली मात्र पक्ष वाढवणाराच आज अडगळीत पडला असून नाथाभाऊंनी असा काय गुन्हा केला ? तो सांगावा, आपण दोषी असल्यास जेलमध्ये जायला तयार आहे, असे भावनाविवश उद्गार राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बोदवड व भुसावळ येथे शनिवारी पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनानंतर आयोजित कार्यक्रमात केले. सरकार काही सांगत नाही म्हणून जनतेच्या दरबारात आपण न्याय मागायला आलो आहोत, एक रुपया कुणाचा खाल्ला असेल तर तेही सांगा, कुठे चोरी-लबाडी केली, किती मालमत्ता जमवली, हॉटेल्स, इंजिनिअरींग कॉलेज काढले तेही सांगावे? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. जर मी पाप केले असेल तर जेलमध्ये जायला तयार आहे मात्र ते कुठे चुकलो हे जनतेपुढे सांगावे वा मलातरी सांगावे, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री पद काढल्यानंतर जिल्ह्याचे वाटोळे
दाऊदच्या पत्नीशी न झालेले संभाषण व त्यावरून चाललेली मिडीया ट्रायल, पीएचे 30 कोटींचे लाच प्रकरण, जावयाने घेतलेली लिमोझीन गाडीचे प्रकरण तर तीन-तीन वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्या मालमत्तांची चौकशी केली असताना त्यातही काही तथ्य आढळले आले नसतानाही शासन आपल्याविषयी काही बोलायला तयार नसल्याची खंत खडसे यांनी व्यक्त केली. 20 महिन्यांपासून आपण मंत्री मंडळाबाहेर असल्याने जिल्ह्याचे वाटोळे झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात सांगा कुठे विकासकामे सुरू आहेत? असा प्रश्‍न उपस्थित करीत पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी मात्र बोदवडसह खडका गावासाठी योजना मंजूर करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केल्याने त्यांनी त्यांचे कौतुक केले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील 51 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन बोदवड येथे तर जलस्वराज्य टप्पा क्रमांक दोन अंतर्गत खडका येथे निमशहरी पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या प्रसंगी ते बोलत होते.

तर पुन्हा विरोधी पक्षनेते व्हायला तयार
आपण विरोधी पक्षनेते असताना सत्ताधार्‍यांची पाचावर धार बसत होती मात्र सुदैवाने आताचा विरोधी पक्ष चांगला असल्याची बोचरी टिका खडसे यांनी केली. मात्र विकासकामे होत नसल्यास, गोरगरीबांवर अन्याय होत असल्यास पुन्हा आपण विरोधी पक्षनेत्याची भूमिकाही वठवू, असा इशाराही त्यांनी दिला. मतदारसंघातील गोरगरीबांना मंजूर झालेल्या घरकुलांच्या याद्या रद्द करण्यात आल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. खडका गावात मद्याचे प्रमाण वाढले असल्याने गावात बाटली आडवी करण्याची (दारूबंदी) करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मंत्री नाही म्हणून नसेल झाला सन्मान
अर्थमंत्री असताना 18 हजार कोटींचे कर्ज काढून विकासकामांना चालना दिली. शेतकर्‍यांना कर्जमाफी व्हावी प्रयत्न केले मात्र एकाही शेतकर्‍याने आपल्याला भेटून ढोल वाजवला नसल्याचे तसेच आभार मानले नसल्याची खंत खडसे यांनी व्यक्त केली. कदाचित आपण मंत्री पदावर नसल्याने हे घडल्याची कोपरखळी त्यांनी मारत मंत्री लोणीकर यांच्याकडे पाहत तुम्ही मंत्री असल्याने कदाचित तुमचा वेगळा अनुभव असावा, असा टोलाही लगावला. शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याची वेळ का आली? यावर संशोधन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
खासदार रक्षा खडसे, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदू महाजन, जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी आमदार दिलीप भोळे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, पंचायत समिती सभापती सुनील महाजन, उपसभापती मनीषा पाटील, पंचायत समिती सदस्या प्रीती पाटील, खडका सरपंच पद्मावती चौधरी, गटनेता मुन्ना तेली, पुरूषोत्तम नारखेडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.