पुणे । प्लॅस्टिक बाटली बंद करण्याचा सरकारचा विचार असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी नुकतेच जाहीर केले. या निर्णयामुळे सुमारे 2 लाख कामगारांचे भवितव्य धोक्यात येणार असून, व्यापारी वर्गदेखील संकटात सापडणार आहे. सरकारने याचाही विचार करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र बॉटल वॉटर मॅन्युफॅक्चर असोसिएशनने सरकारला दिला आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष विजयसिंह डुबल, दत्तात्रेय मारणे, विजय नवले उपस्थित होते.
असोसिएशनतर्फे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची नुकतीच भेट घेण्यात आली. त्यांनी यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या दोन दिवसांत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचीही भेट घेऊन त्यांनाही निवेदन देणार असल्याचे डुबल यांनी सांगितले.
जारमधील पाण्याने आरोग्याला धोका
राज्यभरात सध्या 900 आयएसआयधारक युनिटमध्ये सुमारे 2 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. व्यापार्यांचे कोट्यवधी रुपये या व्यवसायात गुंतले आहेत. प्लॅस्टिक बाटली बंदचा सरकारने निर्णय घेतल्यास 2 लाख नागरिक बेरोजगार होतील. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. या प्लॅस्टिक बाटलीचे रिसायकल होणे शक्य असतानाही सरकार त्या बंद करण्याचा निर्णय घेण्याची घाई का करत आहे? या निर्णयामुळे आयएसआय मार्क नसलेल्या जारमधील पाण्याच्या वापराचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या निर्णयाबाबत सकारात्मक विचार करण्याची गरज आहे, असेही डुबल यांनी सांगितले.