…तर पवारांनी एनडीएत यावे

0

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राष्ट्रपती व्हायची इच्छा असेल, तर त्यांनी एनडीएमध्ये यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. डोंबिवलीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. मराठी माणूस राष्ट्रपती झाला तर आपल्याला आनंदच होईल. मात्र संख्याबळ पाहता विरोधी पक्षांचा उमेदवार राष्ट्रपती होईल, अशी शक्यता नाही. त्यामुळे शरद पवारांनी एनडीएमध्ये यावे, असे आठवले म्हणाले. यावेळी आठवलेंनी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे पत्रकारांना जोड्याने मारण्याचे वक्तव्य चुकीचे असल्याचेही नमूद केले. जुलैमधे राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून जुळवाजुळव सुरू झाली आहे.

त्यामुळेच शिवसेनेचा भाव टिकून
जुलैमधे राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा मागायचा असेल तर त्यासंदर्भातील स्नेहभोजन आणि चर्चा फक्त मातोश्रीवर होईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले होतेे. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या स्नेहभोजनाच्या चर्चा रंगलेल्या असताना राऊत यांनी असे वक्तव्य केले होते, मात्र नंतर उध्दव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. शिवसेनेेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मोहन भागवत यांच्या नावाचा आग्रह धरला होता. परंतू शिवसेना या निवडणुकीसाठी आता भाजप बरोबर राहणार आहे. एनडीएला अजूनही मते कमी असल्याने शिवसेनेचा भाव टिकून आहे.

इच्छूक नाही
मी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नाही. त्या पदासाठी मी इच्छुक नाही. मला माझ्या पक्षाची ताकद आणि मर्यादा याची जाण आहे.
शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस