पेट्रोलमध्ये मिथेनॉल मिसळण्याची चाचणी
पुणे : सातत्याने वाढणार्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे लोकांचे कंबरडे मोडलेले असताना आता एक खूशखबर आहे. पेट्रोलमध्ये मिथेनॉल मिसळण्याची केंद्र सरकारची योजना असून, त्यामुळे पेट्रोलचे दर तब्बल 10 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. निती आयोगाच्या देखरेखीखाली पुण्यात त्यासंबंधी चाचण्याही सुरू आहेत.
सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले जाते. मात्र, त्याचे प्रमाण कमी आहे. उसाच्या चिपाडापासून इथेनॉल बनवले जाते. त्याचा भाव एका लिटरला 42 रुपये आहे, तर मिथेनॉल हे कोळशापासून तयार केले जाते आणि ते एका लिटरला 20 रुपये एवढ्या स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकते.
पेट्रोल दरवाढीमुळे जनतेमध्ये संतापाची लाट निर्माण झाल्यामुळे ते कमी करण्यासाठी केंद्र सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये 15 टक्के मिथेनॉल मिसळलेले पेट्रोल उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून निती आयोगाच्या देखरेखीखाली पुण्यात मारुती आणि ह्युंदाईच्या गाड्यांवर चाचण्याही सुरू करण्यात आल्या आहेत. आगामी दोन ते तीन महिन्यांत या चाचण्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे.
इथेनॉलपेक्षा मिथेनॉल स्वस्त असल्यामुळे पेट्रोलमध्ये 15 टक्के मिथेनॉल मिसळण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. परिणामी, पैशांचीही मोठी बचत होणार आहे. त्याचप्रमाणे मिथेनॉलमुळे प्रदूषण कमी होण्यासही मोठी मदत होणार आहे.
पेट्रोल 10 पैशाने, तर डिझेल 8 पैशाने महागले
पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढू लागले आहेत. मुंबईत पेट्रोल, डिझेलच्या दरात किंचित वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर दहा पैशांची, तर डिझेलच्या दरात आठ पैशांची वाढ झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी नव्वदीपार पोहोचलेले इंधनाचे दर ऑक्टोबरपासून सातत्याने घसरत असून, त्यात तब्बल 16 टक्क्यांनी घट झाली आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 15 आणि डिझेलच्या दरात 13 रुपयांची घट झाली होती. या घसरणीला ब्रेक लागला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात होणारे चढ-उतार आणि रुपयांच्या विनिमय दराचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले