नवी दिल्ली । सीमेपलिकडून सुरू असलेला गोळीबार न थांबल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करण्याचा इशारा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला आहे. पाकिस्तानच्या छुप्या युद्धामुळे भारतातील सामाजिक वातावरण बिघडत आहे, असेही ते म्हणाले. मागील काही काळापासून सीमेपलिकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शस्त्रसंधीच्या सतत होणार्या उल्लंघनाबाबत लष्करप्रमुखांना प्रश्न विचारण्यात आला असता रावत यांनी हा इशारा दिला.
तक्रारंची दखल घेणार!
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या सहकार्याने आम्ही जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यशस्वी झालो आहोत. सीमेवर आमच्यासाठी अनेक आव्हाने असून, धर्मनिरपेक्षतेच्या ढाच्याला उद्ध्वस्त करण्यासाठी काही घटक सक्रीय झाले आहेत. त्यासाठी छुपे युद्धही शत्रू राष्ट्राने सुरु केलेले आहे, या युद्धातही आम्हाला शत्रू राष्ट्राला पुरून उरायचे आहे, असे सांगून लष्करप्रमुख रावत यांनी सांगितले, की दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी आम्ही अलिकडेच केलेले सर्जिकल स्ट्राईक हे शेवटचे नव्हते तर यापुढेही अशाप्रकारचे स्ट्राईक केले जातील. यावेळी त्यांना लेप्टनंट जनरल पी. बक्षी यांच्या तक्रारीबाबत विचारणा केली असता, लष्कराच्या अंतर्गत काही लोकं बक्षी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांनी माझ्याकडे तक्रार करावी, त्याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले. लष्करात महिलांना समान संधी हवी असेल तर समान जबाबदारीही उचलावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच सोशल मीडियावर नाही तर थेट माझ्याकडे तक्रार दाखल करा, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक कमांडमध्ये तक्रारपेटी बसविली जाणार असून, जवानांच्या तक्रारींची आपण स्वतः दखल घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.