तर पेट्रोल पंप रविवारी बंद राहणार

0

नवी दिल्ली : कमिशन वाढवून देण्याबद्दल सरकारकडून अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने पेट्रोल पंप मालकांनी रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. सध्या पेट्रोल पंपांकडून कोणतीही सुट्टी घेतली जात नाही. मात्र केंद्र सरकारकडून कमिशन वाढवून दिले जात नसल्याने रविवारी साप्ताहिक सुट्टी घेण्याचा इशारा देशभरातील पेट्रोल पंप मालकांनी दिला आहे.

10 मे हा दिवस नो पर्चेस डे असेल, असा इशारा देशभरातील पेट्रोल पंप मालकांनी दिला आहे. त्यामुळे या दिवशी पेट्रोलची खरेदी केली जाणार नाही, असे पेट्रोल पंप मालकांनी म्हटले आहे. तसेच पीएसयू संस्थांकडून मिळणार्‍या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी जानेवारी महिन्यातच पेट्रोल पंप मालकांकडून करण्यात आली होती. तेव्हाच कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी संपावर जाण्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र कमिशन वाढवून देण्याबद्दलचे आश्‍वासन केंद्राकडून देण्यात आल्यानंतर पेट्रोल पंप मालकांकडून तेव्हा संप मागे घेण्यात आला होता. परंतू त्यानंतर अद्यापही पेट्रोल पंप मालकांना मिळणार्‍या कमिशनमध्ये वाढ करण्यात आलेली नाही.

कमिशनमध्ये वाढ न केल्यास 10 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलची खरेदी केली जाणार नाही, असा इशारा पेट्रोल पंप मालकांनी दिला आहे. 10 मे रोजी पेट्रोल पंप मालकांनी इंधन खरेदी न केल्सास त्याची झळ सर्वसामान्यांना 14 मे रोजी बसेल. 14 मे रोजी रविवार असल्याने पेट्रोल पंपांवरील कर्मचार्‍यांना सुट्टी देण्यात येईल आणि यानंतरच्या प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद असतील.

15 मे पासून (सोमवारी) पेट्रोल पंप केवळ एकाच शिफ्टमध्ये (सकाळी 9 ते संध्याकाळी 6) सुरू राहतील. जोपर्यंत नुकसान भरून निघत नाही आणि पेट्रोल पंप व्यवसाय फायदेशीर ठरत नाही, तोपर्यंत पेट्रोल पंप केवळ एकाच शिफ्टमध्ये सुरू राहतील, असे पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवी शिंदे यांनी म्हटले आहे. सध्याच्या घडीला पेट्रोल पंप व्यावसायिकांना पेट्रोलच्या प्रति लीटर विक्रीवर 2 रुपये 56 पैसे इतके कमिशन दिले जाते. तर डिझेलच्या प्रति लीटर विक्रीवर 1 रुपया 65 पैसे इतके कमिशन दिले जाते, अशी माहिती इंडियन ऑईलच्या परिपत्रकात देण्यात आली आहे. यामध्ये वाढ करून पेट्रोलच्या प्रति लीटर विक्रीवर 3 रुपये 33 पैसे, तर डिझेलच्या प्रति लीटर विक्रीवर 2 रुपये 13 पैसे कमिशन दिले जावे, अशी मागणी पेट्रोल पंप व्यावसायिकांनी केली आहे.