कोलकाता: भारतीय क्रिकेटला योगदान दिलेल्या सर्वच दिग्गज खेळाडूंचे नाव त्यांच्या घरच्या मैदानातील स्टॅण्डला देण्यात आल्याचे आपण पाहिले असेल. पण फिरोजशहा कोटला या वीरेंद्र सेहवागच्या घरच्या स्टेडियमवर एकाही स्टॅण्डला अजूनही वीरूचे नाव देण्यात आलेले नाही. इंग्लंडविरुद्ध कोलकाताच्या इडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यादरम्यान सुरू असलेल्या कॉमेंट्रीमध्ये हा विषय पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण कॉमेंट्री करत असताना फिरोजशहा कोटला स्टेडियममध्ये वीरुच्या नावाने स्टॅण्ड असायला हवा, अशी मागणी गांगुलीने केली.
भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपला जलवा दाखवताना दिसतो. सेहवाग ज्याप्रमाणे मैदानात आक्रमक फलंदाजी करताना दिसायचा, कॉमेंट्री बॉक्समध्येही वीरू त्याच बेधडक अंदाजात बोलताना दिसतो. सेहवाग हा मूळचा दिल्लीचा असून तो कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतकी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला होता. याशिवाय, एकदिवसीय सामन्यात द्विशतकी कामगिरी देखील सेहवागने केली होती. सेहवागने क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर दिल्ली क्रिकेट बोर्डाने (डीडीसीए) फिरोजशहा कोटला मैदानात त्याच्या सन्मानार्थ एक छोटेखानी कार्यक्रम घेतला होता.
आपल्या राज्यातील माजी क्रिकेटपटूचा सन्मान करणे हे प्रत्येक क्रिकेट संघटनेचे कर्तव्य आहे, असे गांगुली यावेळी म्हणाला. फिरोजशहा कोटला स्टेडियमवर वीरूच्या नावाचेही स्टॅण्ड असायला हवे, जर डीडीसीएने सेहवागला योग्य सन्मान दिला नाही, तर बंगाल क्रिकेट असोसिएशन नक्कीच सेहवागचा उचित सन्मान करेल. सेहवागच्या नावाचेही क्रिकेट स्टॅण्ड इडन गार्डन्सवर तयार केले जाईल, असे आश्वासन गांगुलीने दिले. येणाऱया काळात माजी क्रिकेटपटूंसाठी काही योजना सुरू करणार असल्याचेही गांगुलीने यावेळी सांगितले. भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचाही बंगाल क्रिकेट असोसिएशनच्यावतीने गांगुलीने सामना सुरू होण्याआधी सन्मान केला होता.