…तर बजेट कशाला तयार करता?

0

पुणे । पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येऊन नऊ महिने झाले पण अजूनही विकासकामे केली जात नाहीत. त्यामुळे बजेट केवळ दाखवायला तयार केले का, अशा शब्दात भाजपच्या नगरसेविकेने घरचा आहेर दिला. त्यामुळे त्यांचा रोष कमी करण्यासाठी भाजप पदाधिकार्‍यांची सभागृहात पळापळ झाली.महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत डिसेंबर महिना उजाडला तरी विकासकामे होत नाही याकडे शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी लक्ष वेधले. पालिकेचे दोन्ही अतिरिक्त आयुक्त फाईल्सवर सह्या करत नाहीत. त्या फाईल अडवून ठेवतात. त्यामुळे कामे रखडली आहेत. याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यावर सर्वपक्षीय नगरसेवकाबरोबर भाजपच्या नगरसेविकांनीही विकासकामे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रभागामधील विकासकामे होत नाहीत. मग बजेट कशाला तयार केले, अशा शब्दात त्यांनी टीका केली. त्यावर प्रभाग समित्यांमधील विकासकामे येत्या पंधरा दिवसात मार्गी लावली जातील, असे आश्‍वासन पालिका प्रशासनाने दिले.

भाजपच्या अभिनंदनाच्या तहकुबीवर टीका
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राजकीय तहकुबी मांडायची नाही, असा संकेत आहे. मात्र हा संकेत पायदळी तुडवून गुजरात आणि हिमाचल प्रदेशात भाजपला मिळलेल्या विजयाबददल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदाची तहकुबी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी मांडली. त्यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने टीकेची झोड उठविली. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताला धरून भाजप राज्यात वाढली. आता हीच भाजप सत्तेचा माज करत आहे अशा शब्दात शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी टीका केली. गुजरातमध्ये काँग्रेस हरली आणि भाजप जिवंत आहे. तरी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावर हसू आहे. त्यातच सर्वकाही आले आहे, असे काँग्रेसचे नगरसेवक अजित दरेकर यांनी सांगितले. राजकीय तहकुबी मांडण्याचा सभागृहाचा संकेत नाही. हा संकेत भाजपने पायदळी तुडविला आहे. गुजरात मॉडेल डळमळले आहे, असे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी सांगितले. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे म्हणाले, सत्ता आली असली तरी भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत.