नवी दिल्ली। काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची डिनर डिप्लोमसी यशस्वी होताना दिसत आहे. यात बहुजन समाजवादी पार्टीच्या सुप्रीमो मायावती आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव सामील झाले होते. याच्याच पुढे एक पाऊल टाकत आता मायावती आणि अखिलेश यादव आता सोबत रॅली काढू शकतात. त्यामुळे 1993 नंतर पहिल्यांदाच दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शुक्रवारी सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमामध्येच संयुक्त रॅलीची कल्पना मांडण्यात आली होती. यात लालूप्रसाद यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये मायावती आणि अखिलेश यांनी सोबत यावे, अशी विनंती केली होती. याला सर्व भाजपविरोधी पक्षांनी समर्थन दिले होते तसेच संयुक्त रॅलीच्या कल्पनेलादेखील सर्वांनी पाठिंबा दिला होता. लालूप्रसाद यादव राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यानंतर 27 ऑगस्टला एका भव्य रॅलीचे आयोजन करत आहे, अशी माहिती सपाचे खासदार बसपा नरेंद्र अग्रवाल यांनी दिली आहे.
बहुजन समाजवादी पार्टी आणि समाजवादी पार्टी एकत्र येण्याच्या वृत्ताबाबत बहुजन समाजवादी पार्टीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, स्नेहभोजनादरम्यान झालेल्या बैठकीत मायावती यांनी बहुजन समाजवादी पार्टी आणि समाजवादी पार्टीने एकत्र येण्याचे समर्थन केल्याचे वृत्त आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाजवादी पार्टीला एकही जागा मिळाली नव्हती, तर समाजवादी पार्टीला केवळ 5 जागा मिळाल्या होत्या. मायावती आणि अखिलेश 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी संयुक्त रॅली काढून भाजपविरोधी फ्रंटला बळकटी देऊ शकतात.
ममता बॅनर्जींचेही आवाहन
मार्चमध्ये झालेल्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांचा पराभव झाला होता, तर मायावती यांना लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. तृणमूल काँग्रसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनीही 2019च्या निवडणुकीसाठी बहुजन समाजवादी पार्टी आणि समाजवादी पार्टीने एकत्र यावे असे आवाहन केले आहे. लालूप्रसाद यांनी म्हटले आहे की जर 2019 च्या निवडणुकीत बहुजन समाजवादी पार्टी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेस एकत्र आले, तर या महा आघाडीला किमान 70 जागा मिळू शकतात.
म्हणून कट्टर विरोधक?
सन 1993 मध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी विधानसभा निवडणुकीसाठी एकत्र आले होते. त्यावेळी त्यांना दणदणीत विजय मिळाला होता. पण या दोन पक्षांमध्ये फार काळ चांगले संबंध राहिले नाही. सन 1995मध्ये लखनऊच्या एका गेस्ट हाऊसमध्ये मायावती यांचा मुक्काम होता. तेव्हा त्यांच्यावर काही गुंडांनी हल्ला केला होता. त्यावेळी यूपीचे मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव होते. त्या प्रकरणापासून समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी मधल्या संबंधांमध्ये कडवटपणा आला होता.