तर बांधकाम परवाना देऊ नये

0
समितीचा महत्वपूर्ण ठराव मंजूर
तळेगाव दाभाडे : नगरपरिषदेच्या वृक्ष संवर्धन समितीचे ना हरकत दाखला घेतल्या शिवाय बांधकाम परवाना आणि भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येऊ नये असा महत्वपूर्ण ठराव नगरपरिषदेच्या वृक्षप्राधिकरण समितीत मंजूर करण्यात आला. नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची सभा नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेस मुख्याधिकारी वैभव आवारे, सदस्या शोभा भेगडे, संदीप पानसरे, निलेश गराडे, मंदार खोल्लम, अरुण कुलकर्णी, नगररचनाकार शरद पाटील, उद्यान निरीक्षक विशाल मिंड उपस्थित होते.
वृक्ष लागवडीचे प्रतिज्ञापत्रक
सभेत शहरातील वृक्ष लागवडीच्या सर्वेक्षणावर चर्चा झाली घरबांधणीच्या परवानगीच्या वेळी वृक्ष लागवडीचे प्रतिज्ञापत्रक घ्यावे तसेच भोगवटा प्रमाणपत्र ही देऊ नये याशिवाय वृक्षतोडीसाठी आलेल्या अर्जावर त्वरित निर्णय करावा. बेकायदा वृक्षतोड करणार्‍यावर कायदेशीर कारवाई करावी असे महत्वपूर्ण विषयांना मंजूरी देण्यात आली. ज्या बांधकाम व्यवसायिकांनी बेकायदा वृक्षतोड केली आहे त्यांना नोटीसा देऊनही ते पुन्हा पुन्हा वृक्षतोड करतात त्यांची बांधकाम परवानगी स्थगित करावी अशी मागणी यावेळी काही सदस्यांनी केली.