तर बालभारतीला ठोकणार टाळे

0

पुणे । बालभारतीचा घोळ सुरूच आहे. गेल्या आठवड्यात तिसरीच्या पुस्तकात गंभीर चुका आढळून आल्या होत्या. आता दुसरीच्या पुस्तकातही आठ धड्यांची बालभारतीने पुर्नछपाई केल्याचे आढळून आले. जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना वितरीत केलेल्या दुसरीच्या पुस्तकात हा गंभीर प्रकार उघडला आहे. इयत्ता दुसरी आणि तिसरीच्या पाठ्यपुस्तकांतील या चुकांबद्दल वळेत खुलासा केला नाही तर बालभारतीला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेना गटनेत्या आशा बुचके यांनी दिला आहे.

बालभारतीच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह
जुन्नर तालुक्यामधील वैष्णवधाम गावातील तिसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील चक्क सात धडे गायब झाले होते. तर सहा धड्यांची पुर्नछपाई करण्यात आली होती. तसेच पुस्तकातील 16 पाने वगळण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बुचके यांनी बालभारतीसह प्राथमिक विभागाला धारेवर धरत खुलासा मागितला होता. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता तिसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील चुकांबद्दल तालुकानिहाय अहवाल शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी मागविला होता. दरम्यान हा अहवाल येणे बाकी असताना इयत्ता दुसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकामधील आठ धड्यांची पुर्नछपाई करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यामुळे बालभारतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

पुस्तकांची तपासणी करा
राज्यभरात प्राथमिक शाळेच्या इयत्ता दुसरी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या पुस्तकांची तपासणी करावी. तसेच पुस्तकांची छपाई होण्यापुर्वी त्याचे अवलोकन झाले होते की नाही. बालभारती संस्थेवर कोणाचे नियत्रंण राहिले आहे काय? अशी विचारणा बुचके यांनी केली आहे.

पुस्तक वाटपाची माहिती द्या
राज्यभरात लाखो विद्यार्थी प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. शाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. त्यानंतर मराठी पाठ्यपुस्तकांतील छपाईच्या चुका लक्षात येत आहेत. त्यामुळे बालभारतीच्यावतीने वितरित करण्यात आलेल्या सर्व पुस्तकांचा अहवाल शिक्षणखात्याने मागवावा. त्या अहवालानुसार किती विद्यार्थ्यांना पुर्नछपाई करण्यात आलेल्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. त्याची माहिती शासनाला द्यावी. जर मराठी पाठ्यपुस्तकासंदर्भात बालभारतीने समानधानकारक खुलासा अथवा माहिती दिली नाही तर कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा आशा बुचके यांनी दिला आहे.