तळेगाव येथे व्यक्तिमत्त्व विकास विषयावर पुणे विद्यापीठाची कार्यशाळा
तळेगाव । प्रचलित पद्धतीचा त्याग करून नवनवीन संकल्पनांवर प्रयोग केले तर भारतात उत्तम दर्जाचे अभियंते निर्माण होऊ शकतात आणि तशा नवनिर्मितीच्या क्षमता युवा पिढीमध्ये आहेत, असे मत प्रसिद्ध वक्ते प्रा. डॉ. केशव बोरकर यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व नूतन अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव येथे आयोजित ’विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास योजना’ कार्यशाळेत ते बोलत होते.
सृजनशील विचार करा
ही कार्यशाळा दोन सत्रांमध्ये घेण्यात आली. प्रथम सत्रामध्ये डॉ. बोरके यांनी सृजनशीलता या विषयावर मार्गदर्शन केले. प्रत्येक व्यक्तीने नाविन्यपूर्ण आणि सृजनशील विचार करण्याची सवय विकसीत केल्यास आणि त्यासोबत आत्मविश्वासाने सातत्य ठेवल्यास आपण स्वतःला एक आगळी वेगळी आणि यशस्वी व्यक्ती म्हणून सिद्ध करू शकतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
सकारात्मक विचारांवर मार्गदर्शन
द्वितीय सत्रामध्ये विद्यार्थी विकसन अधिकारी प्रा. विजय नवले यांनी ’सकारात्मक विचार व व्यक्तिमत्त्व’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच कौतुक करण्याची कला व चेहर्यावरील स्मितहास्य व्यक्तिमत्त्व सुंदर बनविते, असा बहुमोल मंत्र विद्यार्थ्यांना दिला. यावेळी कार्यशाळेस प्रा. मनोजकुमार काटे उपस्थित होते. चैतन्य यादव या विद्यार्थ्याने सूत्रसंचालन तर कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांनी आभार मानले. आर्या सिंग, अनिकेत नाचणेकर आणि अंशुमन राव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.