पंढरपूर : दुष्काळात जनतेला आधार देण्याऐवजी दुष्काळात तुमची जनावरे नातेवाईकांकडे नेऊन घाला असा बेजबाबदार सल्ला देणा-या मंत्र्यांच्या घरी शेतकऱ्यांनी खरोखरच आपली जनावरे नेऊन घालावीत. मी ही माझ्या घरची 5 जनावरे मुख्यमंत्र्यांच्या घरी वर्षा वर नेऊन घालणार असल्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे आयोजित विविध स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी मुंडे येथे आले असता कार्यक्रमाआधी ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील दुष्काळाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप करतांना मुंडे म्हणाले की, सरकार 2 महिन्यापासून फक्त केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवल्याचे सांगत होते . नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मी दुष्काळावरील चर्चेत बोलतांना सरकारने केंद्राकडे मदतीचा आणखी प्रस्तावच पाठवला नसल्याचे सांगितले होते, मुख्यमंत्र्यांनी काल प्रस्ताव पाठवला , यावरूनच मी बोललो ते सत्य होते आणि सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही हे स्पष्ट होते.
दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही, चर्चा करून काही होणार नाही म्हणून आम्ही अधिवेशनात हेक्टरी 50 हजार, फळबागांना एक लाख रुपये द्यावे अशी मागणी केली होती. संपूर्ण वीज बिल माफ, संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ, एमआरजीएस चे आराखडे मंजूर करावेत, संपूर्ण कर्जमाफी, टँकरचे अधिकार तहसीलदार यांना द्या, जनावरांना चारा छावण्या, पाण्याची सोय या आमच्या मागण्या कायम असल्याचे मुंडे म्हणाले.
हिरे कुटुंबियांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाने पक्षाला मजबूती आली आहे, आता घरवापसी जोरात सुरू झाली असून 11 तारखेच्या चार राज्याच्या निकालानंतर ती अधिक वेग घेईल असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. यावेळी आमदार भारत भालके, आमदार बबनदादा शिंदे, माजी आमदार दीपक आबा साळुंके, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील आदी उपस्थित होते.