मुंबई-पालघर लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यान समोर आलेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये शिवसेनेने फेरफार केला आहे. ही १४ मिनिटांची ऑडिओ क्लिप आपण निवडणूक आयोगाकडे पाठवली असून त्यामध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास निवडणूक आयोगाने आपल्यावर कारवाई करावी असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर या क्लिपमधील साम-दाम-दंड-भेद याचा अर्थ ज्यांना समजावून घ्यायचा आहे त्यांना तो समजावून देऊ, असेही ते म्हणाले. शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांकडे या शब्दांचा अर्थ काय? असा सवाल करण्यात आला होता, त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.
मोदी सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त राज्याला विविध योजनांमार्फत झालेल्या फायद्यांची माहिती देण्यासाठी आजोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. गेल्या चार वर्षांत केंद्रातील मोदी सरकारने प्रचंड मोठे काम केले असून ते अतुलनिय आहे. केंद्राच्या मदतीने राज्य शासनाने राबवलेल्या विविध योजनांचा हिशोब केल्यास कोट्यवधी लोकांना याचा फायदा मिळाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.