मुंबई । मुंबई व उपनगरांतील डोंगर उतारावरील झोपड्यांवर दरडी कोसळू शकतील, अशी जवळपास 290 धोकादायक ठिकाणे दरडीच्या छायेखाली असून, यातील सर्वात जास्त 219 ठिकाणे ही केवळ पूर्व उपनगरात आहेत. यामुळे या झोपडीधारकांना वेळीच हलवावे, अन्यथा त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, असा अतिधोक्याचा इशारा मुंबई मनपाने प्रशासनाला दिला आहे. यामुळे मुंबई उपनगरातील विशेषत: पूर्व उपनगरातील झोपडीधारकांनी विशेष काळजी घ्यावी, असेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
दरवर्षी पावसाळ्याच्या काही दिवस आधी मुंबई महापालिकेकडून झोपड्यांवर नोटीस चिटकवण्याची नेहमीची जबाबदारी पार पाडली जाते. रहिवाशांनी त्वरित स्थलांतरित व्हावे, अशा सूचना त्या नोटीसमध्ये नमूद केलेल्या असतात. इतकी कुटुंबे कुठे स्थलांतरित होणार, असा मोठा प्रश्न असल्याने पाऊस संपेपर्यंत जीव मुठीत घेऊन रहिवाशांना त्याच झोपड्यांमध्ये राहण्याचा निर्णय घ्यावा लागतो.
केंद्र सरकारने केलेल्या सूचनेनुसार पालिकेने मुंबईतील दरडी कोसळण्याच्या 299 ठिकाणांची पाहणी करून धोकादायक, अतिधोकादायक, असे वर्गीकरण करण्यात आले आहे. यात सुमारे 290 ठिकाणे दरडीच्या भयाखाली असल्याचे म्हटले जात आहे. शहरातील 38 पश्चिम उपनगरांत 33 आणि पूर्व उपनगरात 219 ठिकाणी दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका आहे, तर 24 प्रभागांत 20 अतिधोकादायक ठिकाणे असून, पूर्व उपनगरात 16 ठिकाणांचा समावेश आहे. दरम्यान, दरडी कोसळून जीवित व वित्तहानी होऊ नये याकरिता संरक्षण भिंती बांधण्याबाबत म्हाडा प्राधिकरणास सूचना करण्यात आली आहे, तर धोकादायक ठिकाणी राहणार्या नागरिकांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी महापालिकेला नोटीस बजावल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.