….तर मोबाइल टॉवर पेटून दुर्घटना घडली असती, वेळीच बंब पोहोचल्याने अनर्थ टळला !

0


महाबळ चौकातील मानस प्लाझातील घराला आग


शॉटसर्किटने आग लागल्याची शक्यता


जळगाव- शहरातील महाबळ चौकातील मानस प्लाझा मधील अ‍ॅड. सरोज दिलीप लाठी यांच्या बंद घराला अचानक भिषण आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. आगीत घरातील बेडरुममधील टीव्ही, एसी, फॅन या इलेक्ट्रॉनिक वस्तूसह लाकडी कपाट, गाद्या व कपडे जळून खाक झाले आहे. नेमके आगीच कारण कळू शकलेले नाही, शॉटसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान तिसर्‍या मजल्यावरील या घराच्यावर मोबाईल टॉवर आहे. अवघ्या सहा मिनिटात अग्निशमन बंब पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले. अन्यथा टॉवरपर्यंत आग पोहचून मोठी दुर्घटना घडली असती.

मानस प्लाझा या बिल्डींगमधील तिसर्‍या मजल्यावर ब्लॉक नं 201 मध्ये महावितरणमधील सेवानिवृत्त अधिकारी दिलीप लाठी हे त्यांची पत्नी अ‍ॅड. सरोज लाठी व मुलासह वास्तव्यास आहे. अ‍ॅड. सरोज ह्या जळगाव कोर्टात प्रॅक्टीस करतात. विकास सोबत राहतो तर दुसरा मुलगा विपुल नोकरीनिमित्ताने हा नाशिकला राहतो. अ‍ॅड लाठी ह्या पतीसोबत तीन ते चार दिवसांपूर्वी नाशिकला गेलेल्या आहेत. त्यामुळे घर बंद होते.

माजी सभापतींमुळे घटना झाली उघड
महापालिकेचे माजी स्थायी समितीचे सभापती नितीन बरडे हे त्यांच्या काही मित्रांसमवेत घराजवळील चहाच्या दुकानावर उभे होते. यादरम्यान बरडे यांना मानस प्लाझा बिल्डींगमधी अ‍ॅड. लाठी यांच्या घरातून मोठे धुराचे लोट असल्याचे दिसले. काही वेळाच आगीने भिषण रुप धारण केल्याने बरडे यांनी तत्काळ काव्य रत्नावली चौकातील अग्निशमन कार्यालयात फोन लावला. यानंतर बरडे यांनी घरमालक अ‍ॅड. लाठी यांना फोनवरुन प्रकार कळविला. दिलीप लाठी यांनी त्यांचे शहरातील बाजाली पेठमधील लहान भाऊ राजेंद्र लाठी यांना माहिती देवून घरी जाण्यास सांगितले.

बंद घराचे कुलूप तोडून विझविली आग
आगीची माहिती मिळताच अवघ्या सहाच मिनिटात अग्निशमन बंबासह अग्निशमन अधिकारी शशीकांत बारी, रोहीदास चौधरी, अश्वजीत घरडे, प्रकाश चव्हाण, प्रदीप धनगर यांनी घटनास्थळ गाठले. आगीचे विक्राळ रुप पाहताच कर्मचार्‍यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. व मागच्या बाजूने पाण्याचा मारा केला. अवघ्या दहा मिनिटात आगीत बेडरुममधील टीव्ही, फॅन, एसी या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह कॉट, लाकडी कपाट, गादी, पलंगात ठेवले, चादरी, कपडे अशा सर्व वस्तू खाक झाल्या. सभापती बरडे यांच्यासह मानस प्लाझामधील नरेंद्र चौधरी, हरिश साहू, वासुदेव सोनवणे, सुनील सोनवणे, दिपक चौधरी, नितीन तायडे यांनीही मदत कार्य केले. बेडरुमच्या बाहेर भरलेले सिलेंडर होते. रहिवाशांनी गांभीर्य ओळखत तत्काळ सिलेंडर हलविल्यानेही अनर्थ टळला. अ‍ॅड. सरोज लाठी जळगावकडे येण्यास निघाले असून ते आल्यावर नेमका नुकसानाचा आकडा कळू शकणार आहे.