आंबेगाव । खेड ते सिन्नर रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी येथील शेतकर्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या आहेत. या शेतकर्यांना त्याचा योग्य मोबदला द्यावा, जोपर्यंत बाधित शेतकर्यांना योग्य मोबदला शासन देणार नाही तोपर्यंत आमच्या जमिनीतून जाणार्या रस्त्याचे काम आम्ही होऊ देणार नसल्याची भूमिका शेतकर्यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या समोर मांडल्याची माहिती खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी दिली.
शेवाळवाडी येथील शेतकर्यांना त्यांच्या क्षेत्राचा योग्य मोबदला मिळावा यासाठी खासदार आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी शेवाळवाडी येथील शेतकर्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. या बैठकीस उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील, पी. जी. खोडस्कर, अजित देशमुख, झोडगे, सुनिल बाणखेले, देविदास दरेकर, शिवाजी राजगुरु, संतोष डोके, शशिकांत बढे, अशोक थोरात, नितीन थोरात, तानाजी बढे आदी उपस्थित होते.
जमिनीचा योग्य मोबदला द्या
खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी या बैठकीत येथील शेतकर्यांना पूर्वी निश्चित केलेला मोबदला व त्यांना देण्यात येणारी रक्कम यात तफावत असल्याचे राव यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर तोडगा काढून शेतकर्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला लवकरात लवकर द्यावा, अशी मागणी केली. जोपर्यंत बाधित शेतकर्यांना त्यांच्या जमिनीच्या संपादनाचा योग्य मोबदला शासन देणार नाही, तोपर्यंत आमच्या जमिनीतून जाणार्या रस्त्याचे काम आम्ही होऊ देणार नसल्याचे शेतकर्यांनी यावेळी जिल्हाधिकार्यांना सांगितले.
शेतकर्यांच्या बाजूने अहवाल
अधिकारी वर्गाने चूक केली आहे. मात्र, नुकसान भरपाई वाढवून देण्याचा अधिकार लवादाकडे आहे, तिथे अपील करावे लागेल. त्यावेळी आपण शेतकर्यांच्या बाजूने अहवाल देऊ.
– सौरभ राव, जिल्हाधिकारी