तर, राजपूत पुन्हा एकदा ‘जोहर’ करतील!

0

‘पद्मावती’ चित्रपटाला होत असलेला विरोध तीव्र होत गेला, तसा काही प्रसारमाध्यमांनी ‘पद्मावती’ नावाची अशी कोणी नव्हतीच, हा चित्रपट काल्पनिक कथानकावर आधारित आहे, असा कांगावा चालू केला. त्यात जावेद अख्तरसारखे गीतकार स्वतः इतिहासकार असल्याच्या थाटात ‘पद्मावती’ ही ‘अनारकली’सारखीच काल्पनिक असल्याची बांग ठोकली; पण ‘पद्मावती’ला काल्पनिक म्हणणार्‍या ‘अख्तर आणि कंपनी’ला मला विचारायचे आहे की, या चित्रपटातील अल्लाउद्दीन खिलजी काल्पनिक आहे काय? राजा रतनसिंह काल्पनिक आहे काय? चित्तोडगडावर झालेली लढाई काल्पनिक आहे काय? आणि 16000 स्त्रियांनी केलेला ‘जोहर’ काल्पनिक आहे काय? जर हे काल्पनिक नाहीत आणि केवळ राणी ‘पद्मावती’च काल्पनिक कशी? मग ‘जोहर’ केला कोणी?

पूर्वीच्या काळी राजस्थानच्या प्रत्येक राजघराण्यांत रोजनिशीच्या नोंदी करण्याची पद्धत होती. या राजघराण्यांतील नोंदवह्यांचे जवळपास वीस हजार दस्तऐवज आजही चित्तोड आणि बिकानेर येथील पुरातत्व विभागाकडे उपलब्ध आहेत. ते वाचावेत आणि राणी पद्मावतीचा इतिहास समजून घ्यावा आणि जर या महंमदाच्याच कवितेचा आधार घ्यायचा असेल, तर याच कवितेत त्याने, ‘सिंहल द्वीपाची (श्रीलंकेची) राजकन्या असलेल्या पद्मावतीशी विवाह करण्याच्या निश्‍चयाने चित्तोडचा राजा रतनसिंह निघतो; मात्र भारत आणि श्रीलंका यांच्यातील अथांग समुद्राला पाहून पद्मावतीला प्राप्त करणे अशक्य आहे, म्हणून निराश होतो आणि तेथील समुद्रातच आत्मार्पण करण्याचा निश्‍चय करतो. त्या वेळी तेथे शिव-पार्वती प्रगट होतात आणि राजा रतनसिंहाला ‘काळजी करू नकोस, तुला पद्मावती अवश्य मिळेल’, असे आशीवर्चन देतात,’ असे लिहले आहे. जर ही कथा ग्राह्य मानणार असू, तर शिव-पार्वती यांचा हा प्रसंग ‘पद्मावती’ चित्रपटात घेतला जाईल का? महंमद जायसीने देवतांकडून मिळालेल्या या उच्च आध्यात्मिक अनुभूतीचा उल्लेख केला आहे, त्यावर प्रसारमाध्यमे चर्चासत्रे करतील का? हिंदूद्रोहाची झापडे लावलेली हिंदी चित्रपटसृष्टी आणि प्रसारमाध्यमे यांच्याकडून अशा अपेक्षाच नाहीत! राजपूत करणी सेनेसह हिंदू संघटना गेले दीड वर्ष या चित्रपटाला विरोध करत आहेत. राजस्थानात शूटिंग बंद करायला भाग पाडून कानशिलात खाऊनही भन्साळी नमले नाहीत. आताही हिंदू संघटना टोकाचा विरोध करत आहेत. तरी त्यांच्या प्रतिनिधींना चित्रपट दाखवावा, असे भन्साळी यांना वाटत नाही. ‘सेन्सॉर’चे नियम धाब्यावर बसवून चित्रपट परीक्षणासाठी पाठवला. परस्पर सेन्सॉर न झालेला चित्रपट आपल्या गोतावळ्यातील निवडक पत्रकारांना दाखवला, यातून भन्साळींच्या लेखी ‘सेन्सॉर बोर्डा’ची काय किंमत आहे, ते दिसून आले. आता तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पंजाब या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या चित्रपटावर राज्यात बंदी घातली. अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, राज्यांचे मंत्री, आमदार आदींनी तीव्र विरोध करत आक्षेपार्ह प्रसंग हटवल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित करू नये, अशी मागणी केली. जनभावनांची किंमत नाही, प्रशासनाची किंमत नाही, शासनकर्त्यांची किंमत नाही, कोणासमोरही झुकायला तयार नसलेले भन्साळी यांचा हा अहंकार म्हणायचा की पैशाचा माज! जे काही आहे, ते उतरवायला आता भाग पाडायला हवे.

गेली काही वर्षे चित्रपटांच्या माध्यमातून हिंदू धर्म, संत, प्रथा-परंपरा, संस्कृती यांची विटंबना रोखण्यासाठी विविध स्तरांवर विरोध होत आहे. जो-तो ज्याच्या-त्याच्या क्षमतेने भावना दुखावल्याचा निषेध करत असतो. एखाद्याला भावनांवर संयम ठेवता न आल्यास कायदा हातात घेऊन विरोध करेल. कायदा मोडणार्‍या कोणत्याही कृतीचे मी समर्थन करणार नाही. मात्र, एखाद्याला कायदा मोडायला भाग पाडणारी स्थिती जर कोणी वारंवार निर्माण करत असेल, तर एखाद्याच्या धर्मभावना सातत्याने पायदळी तुडवल्या जात असतील, तर एखाद्याने कितीही संयमाने विरोध केला, तरी त्याच्या निषेधाची दखलच घेतली जात नसेल, तर कायदा मोडण्याचा प्रयत्न एखाद्याकडून होऊ शकतो, अशी स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी जनता, सरकार, पोलीस आणि चित्रपट निर्माते-दिग्दर्शक प्रत्येकानेच जबाबदारीने काम केले पाहिजे. कोणीही अभिव्यक्ती आणि कला स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहासाची मोड-तोड करत असेल, तर ते खपवून घेतले जाऊ शकत नाही. करणी सेनेच्या नेत्यांनी ‘पद्मावती प्रदर्शित केल्यास चित्रपटगृह जाळू’, अशा दिलेल्या धमक्या त्यांच्या भावनांची तीव्रता दर्शवणार्‍या आहेत. याची दखल चित्रपटसृष्टी, ‘सेन्सॉर बोर्ड’, पोलीस प्रशासन आणि राज्यकर्ते यांनी घ्यायला हवी. अन्यथा एकदा राणी पद्मावतीने स्वतःच्या शीलरक्षणासाठी ‘जोहर’ केला होता, आज तिचेच वंशज असलेल्या आणि त्याच रक्ताच्या क्षत्रियांनी राजपूत अस्मितेसाठी आणि इतिहासाच्या शीलरक्षणासाठी काही ‘जोहर’ केला, तर नवल वाटायला नको!

– चेतन राजहंस,
प्रवक्ता, सनातन संस्था
7775858387