मुंबई । एकीकडे 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेने केली असताना दुसरीकडे मात्र शिवसेनेला पक्षांतर्गत वादाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, त्याकडे सपशेल दुर्लक्ष होताना दिसत आहे. घाटकोपरमध्ये शिवसेनेतील असाच अंतगर्र्त वाद सध्या चव्हाट्यावर आला असून, बाहेरून आलेल्या लोकांनाच पक्षात घ्यायचे असेल तर राज ठाकरे यांनाच का घेत नाही, असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी बॅनरबाजीतून केला आहे. मनसेतून शिवसेनेत आलेल्यांना पद दिल्याने शिवसैनिकांनी उघडउघड आपली नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेतील नवीन नियुक्त्यांवरून घाटकोपरमध्ये शिवसैनिकच आपापसात भिडल्याची घटना घडली. शाखाप्रमुख पदावरून दोन गटांतील शिवसैनिकांचा राडा झाला.
ईशान्य मुंबई विभागप्रमुख राजेंद्र राऊत साहेब यांच्या धोरणानुसार ईशान्य मुंबई विभाग क्र. 8 च्या नवनियुक्त पदाधिकार्यांची उपविभाग प्रमुख, विधानसभा संघटक, सहसंघटक व शाखाप्रमुख यांची यादी नुकतीच जाहीर झाली. त्याचवेळी लक्षात आले की, यातील नियुक्त्या करण्यात आलेले बरेच जण अनेक पक्ष फिरून संघटनेच्या विरोधात निवडणूक लढवून किंवा विरोधात काम करणार्यांना मा. विभागप्रमुखांनी संघटनेची सन्मानाची पदे बहाल केली आहेत. याचा अर्थ असा होतो की सध्या शिवसेनेत या पदांच्या लायकीचा निष्ठावंत शिवसैनिक या पदाच्या लायकीचे नाही. त्यामुळे मा. राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून आलेल्या लोकांना महत्त्वाचे पदे बहाल करण्यात आली. त्या ऐवजी मा. राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही?
शिवसैनिकांनी व्यक्त केला संताप
घाटकोपर पश्चिममधील शाखा क्रमांक 129 च्या बाहेर शिवसैनिकांचा राडा झाला. या शाखेच्या विभागात प्रदीप मांडवकर हे गेल्या सहा वर्षांपासून विभागाचे शाखाप्रमुख होते. मात्र, नव्या नियुक्तांनंतर शिवाजी कदम यांची या पदावर निवड झाली. शिवाजी कदम यांनी वर्षभरापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला. शिवाय त्यांचे वयही जास्त आहे. त्यामुळे कदम यांना शाखाप्रमुख पद दिल्याने स्थानिक शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली. याच नाराजीतून मांडवकर आणि कदम यांचे समर्थक आपापसात भिडले. घाटकोपरमध्ये नाराज शिवसैनिकांनी इशान्य मुंबईची नवनिर्माण शिवसेना अशी बॅनरबाजी केली आहे. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना घेण्याऐवजी राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाही?, असा सवाल शिवसैनिकांनी होर्डिंगच्या माध्यमातून केला आहे. शिवसेनेला निष्ठावंतांची गरज नाही, तर चार घरे फिरून आलेल्या लोकांची पक्षाला गरज असल्याचे म्हणत आपला संताप शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.
कोणत्या पदाधिकार्यांवरून नाराजी आहे?
बाबू दरेकर
(उपविभागप्रमुख) पूर्वी – मनसे
विजय पडवळ
(उपविभागप्रमुख) पूर्वी – मनसे भाजप
ज्ञानेश्वर वायाळ
(विधानसभा संघटक) पूर्वी – मनसे
बाबू साळुंखे
(शाखाप्रमुख) पूर्वी – मनसे/राणे समर्थक
शिवाजी कदम
(वय वर्षे 65 शाखाप्रमुख) पूर्वी – मनसे
नाना ताटेले
(शाखाप्रमुख) पूर्वी – राष्ट्रवादी, मनसे, भाजप
शरद कोथरे
(शाखाप्रमुख) पूर्वी – मनसे