मुंबईः 2014 सालानंतर देशात ज्या काही निवडणूका झाल्या त्या सर्व निवडणूकांमध्ये भाजपने चांगलीच प्रगती केली असून या निवडणूकांमध्ये विजयही मिळविला आहे. तरीही महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूका लागल्यास त्या लढू आणि जिंकू असे सांगत मध्यावधी निवडणूकांविषयीच्या चर्चेला भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पूर्णविराम दिला.
देशव्यापी दौर्यानिमित्त तीन दिवसाच्या मुंबई दौर्यावर आलेल्या भाजपचे अमित शहा यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीच्यावतीने पत्रकार परिषद दादर येथील भाजपच्या वसंत स्मृती इमारतीत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. संपूर्ण देशभरात ज्या ज्या ठिकाणी निवडणूका झाल्या त्या सर्व ठिकाणी भाजपने चांगलाच विजय मिळविला आहे. तसेच प्रत्येक राज्यात भाजपची ताकद वाढली असून पक्ष संघटनेतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत देशातील 13 राज्यांमध्ये भाजपचे सरकार सत्तेवर आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारप्रमाणे राज्यातील देवेंद्र सरकारही चांगले काम करत असून हे सरकार आपला पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपची ताकद वाढविण्यासाठी दौरा
राज्यातील शेतकर्यांनी पुकारलेल्या संप हा देवेंद्र सरकारने योग्यरितीने हाताळला असून त्यात त्यांना यश आहे आहे. तसेच राज्य सरकारचे काम अतिशय चांगल्या पध्दतीने सुरु असल्याबाबतचे प्रशस्ती पत्रकही त्यांनी यावेळी देंवेद्र सरकारला देवून टाकले. तसेच राज्यासह संपूर्ण देशात भाजपची ताकद वाढविण्याचा निर्णय घेतला असून ही ताकद वाढविण्यासाठीच या दौर्याचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
आज घेणार उद्धव ठाकरेंची भेट
रविवारी ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या भेटीआधीच त्यांनी मध्यावधी निवडणुकांसाठी आम्ही तयार असल्याचं सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमधील संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. अशा वेळी सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा अनेकदा शिवसेना नेत्यांनी दिला आहे. तसंच मध्यावधी निवडणुकांचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
काश्मीर प्रश्न लगेच सुटणारा नाही
काश्मीर प्रश्न हा आता घडणार्या घटनांवरून लगेच समजणारा नाही. त्यासाठी 1998 सालापासून तेथील सर्व घटनांकडे पहावे लागणार आहे. या घटनांचा अभ्यास केल्यास काश्मीर प्रश्न समजून घेण्यास मदत होईल. मात्र गेल्या काही दिवसांपासून लष्करी जवांनावर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून योग्य ती काळजी घेण्यात येईल तसे प्रयत्नही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.