तर विराटला सर्वाधिक वेतन

0

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या वेतनावरून वाद सुरू आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वेतनामध्ये वाढ करावी, असा मुद्दादेखील उपस्थित केला होता. त्यानंतर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी खेळाडूंच्या वेतन वाढीसंबंधातील प्रस्ताव बीसीसीआयच्या सल्लागार समितीसमोर सादर केला. या प्रस्तावाच्या माध्यमातून सल्लागार समितीकडे अ श्रेणीतील खेळाडूंसाठी 12 कोटी, ब श्रेणीतील खेळाडूंना 8 कोटी तर क श्रेणीतील खेळाडूंना 4 कोटी वार्षिक वेतन मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना सर्वाधिक वेतन मिळते. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथला वर्षाला 12 कोटी रुपये इतके वेतन दिले जाते. इंग्लंडचा कर्णधार जो रुटलाही जवळपास तेवढेच वेतन मिळते. त्यामुळे बीसीसीआयने वेतन वाढीचा प्रस्ताव मान्य केल्यास विराट कोहली सर्वाधिक वेतन मिळवणारा कर्णधार ठरेल.

कारण विराट सध्या अ श्रेणीत आहे संघाचे नेतृत्व करत असल्यामुळे इतर खेळाडूंपेक्षा त्याला अधिक वेतन मिळेल. सध्या भारतीय संघातील अ श्रेणीतील खेळाडूंना 2 कोटी, ब श्रेणीतील 1 कोटी आणि क श्रेणीतील खेळाडूंना 50 हजार वार्षिक वेतन दिले जाते. बीसीसीआय प्रशासकीय समिती अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी खेळाडूंच्या वेतन वाढीला समर्थन दिले होते. प्रत्येक क्षेत्रात वेतनवाढ केली जाते. इतर क्षेत्राप्रमाणे खेळाडूंच्या वेतनातदेखील वाढ व्हायला हवी, असे मत गांगुलीने व्यक्त केले आहे.