तर शेतकर्‍यांना येतील चांगले दिवस

0

पुणे । शेतकर्‍यांची वेदना जाणून घेऊन आयोजीत करण्यात आलेल्या ’संवाद कलाकारांचा, संवेदना शेतकर्‍यांची’ या संमेलनाद्वारे शेतकर्‍यांना त्यांचे कृषी उत्पादन तसेच कृषीपूरक उत्पादने मांडण्यांची संधी मिळाली आहे. अशा सांस्कृतीक व्यासपीठांवरून प्रतिसाद मिळाल्यास शेतकर्‍यांना चागंले दिवस येतील, असा आशावाद महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे जिल्हा अधिक्षक डॉ. सुभाष काटकर यांनी व्यक्त केला.

शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना नवी ऊर्जा देण्यासाठी संवाद, पुणे आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने ’संवाद कलाकारांचा, संवेदना शेतकर्‍यांची’ हे संमेलन बालगंधर्व रंगमंदिर परिसरात भरविण्यात आले आहे. रविवारपासून सुरू झालेले हे संमेलन मंगळवारपर्यंत चालणार आहे. यानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने येथे आयोजित फळा-फुलांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. काटकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. विलास करंदीकर यांच्या भातुकलीच्या खेळातील सुमारे तीन हजाराहून अधिक भांडी आणि इतर साहित्याचे प्रदर्शनही येथे भरविण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन प्रसिद्ध सिने-नाट्य कलाकार प्रशांत दामले यांच्या हस्ते झाले. ही दोन्ही प्रदर्शने मंगळवारपर्यंत सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुली राहणार आहेत.

भातुकलीच्या भांड्याचे प्रदर्शन
दिनकर कानडे, प्रविण कदम, सुर्यकांत वडखेलकर, विठ्ठल सोनवणे आणि विजय कोलते आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. फळे-फुले-भाज्यांच्या या प्रदर्शनात विविध जाती, प्रतींचे नमुने मांडली आहेत. बांबूपासून निर्मीत उत्पादनाचे देखील स्टॉल येथे मांडण्यात आले आहे. संवाद पुणे संस्थेतर्फे आयोजीत या भातुकलीच्या भांड्याचे प्रदर्शन देखील सर्वांना आकर्षित करते. शेतकर्‍यांच्या वेदनेशी कलेच्या माध्यमातून जोडले जाण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सिने-नाट्य कलाकार प्रशांत दामले यांनी यावेळी सांगितले.