…तर संजय दत्तला पुन्हा जेलमध्ये पाठवू

0

मुंबई। व्हीआयपी स्टेटसमुळे नियमांचं उल्लंघन करुन अभिनेता संजय दत्तला पॅरोल मिळाला असेल, तर त्याला पुन्हा तुरुंगात जावं लागेल, असं राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं. पाच वर्षांची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच संजय दत्तला तुरुंगातून का सोडलं, यासंदर्भात स्पष्टीकरण देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मागील महिन्यात दिला होता. यावर स्पष्टीकरण देतांना राज्य सरकारतर्फे न्यायालयात ही माहिती देण्यात आली.

भालेकर यांची याचिका
सन 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्त याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. परंतु शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्यास आठ महिने शिल्लक असताना त्याची सुटका का करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित करत पुण्यातील प्रदीप भालेकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. नंतर संजय दत्तची व्हीआयपी स्टेटसमुळे त्याला पॅरोलवर सुटका करण्यात आली का? असा जाब मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला जाब विचारला होता. त्यावर राज्य सरकारने गुरुवारी स्पष्टीकरण दिले आहे.

अनेकदा झाली होती टीका
संजय दत्त अनेक वेळा फर्लो आणि पॅरोलवर बाहेर होता. 100 पेक्षा जास्त दिवस तो जेलबाहेर असल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याची टीकाही झाली होती. संजय दत्तची 16 मे 2013 ला येरवडा कारागृहात रवानगी झाली होती. त्याने 18 महिने तुरुंगात घालवले होते.