नांदेडः महाराष्ट्र महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. तिन्ही पक्षात विचारभिन्नता असल्याने हे सरकार टिकणार नाही असे भाकीत वर्तविले जात आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी तिन्ही पक्ष एकत्र येण्यामागील गुपित सांगितले आहे. महाराष्ट्रात तीन विचारांचे सरकार चालणार कसे?, असा सवाल करीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी तीन पक्षाच्या सरकारला विरोध केला होता, परंतु, आम्ही सोनिया गांधी यांना राजी केले, असा गौप्यस्फोट देखील अशोक चव्हाण यांनी केला आहे. घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले असल्याचे खळबळजनक व्यक्तव्य करून सेनेने जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशाराही अशोक चव्हाण यांनी दिला आहे. नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
राजकारण असो की चित्रपट, नाट्य क्षेत्र असो हे तीन ही सारखेच आहेत. आमचे तीन पक्ष एकत्र येतील असे वाटले नव्हते. पण आम्ही एकत्र आलो. हल्ली मल्टिस्टारचा जमाना आहे. तीन हिरो पाहिजे. त्यामुळे आमचे सरकार सत्तेत आले. तीन विचारांच्या पक्षाचे सरकार चालणार कसे, या प्रश्नावर आम्ही म्हणतो, घटनेच्या आधारावर आपले सरकार चालले पाहिजे. ही आमची भूमिका आहे. संविधानाच्या चौकोटीत राहून हे सरकार चालले पाहिजे. जर असे झाले नाही तर सरकारमधून बाहेर पडण्याच्या कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिल्या आहेत. याची संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनेच्या बाहेर जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे, त्यामुळे आमचे सरकार व्यवस्थित सुरू आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.