…तर सहकुटुंब आत्महत्या करू

0

बारामती । बारामती-फलटण रेल्वे मार्गासाठी थोपटवस्ती कुरणेवाडी, ढाकाळेे, माळवाडी, सोनकसवाडी, या पाच गावातील शेतकर्‍यांनी जमीन देण्यास तीव्र विरोध केला आहे. जमिनीचे बळजबरीने भ्ाूसंपादन करू नये, असे निवेदन सोमवारी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना देण्यात आल होतेे. मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच ग्रामस्थांनी प्रांताधिकारी हेमंत निकम यांना भेटून निवेदन दिले व चर्चा केली. राज्यसरकारने बळजबरीने भूसंपादन केल्यास शेतकरी सहकुटुंब गळफास घेऊन आत्महत्या करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. शेतकर्‍यांनी याबाबतचे निवेदन व हरकतपत्र ही यावेळी सादर केले. गणपत रासकर, दत्तात्रय घोरपडे, धनसिंग जगताप, मारूती भोईटे, विकास जगताप, नंदकुमार मोरे, अजित जगताप, राजेंद्र ढवाण व महिला शेतकरी मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होत्या.

13 गावांमधील भूसंपादन
बारामती फलटण रेल्वे मार्गासाठी 170 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. या संपादनासाठी 2014 व 2015 च्या भूमापन कायद्यानुसार शेतकर्‍यांना मोबदला देण्यात येणार आहे. बारामती तालुक्यातील 13 गावांमधील भूसंपादन होणार असून रेल्वे खात्याने भूसंपादनासाठीचा पहिला हप्ता 100 कोटी रुपयांचा महसूल खात्याकडे वर्ग केला आहे. कोणत्याही प्रकारचा अडथळा न आल्यास 6 महिन्यात प्रक्रिया पुर्ण करण्याची शासनाने तयारी दाखविली आहे.

शेतकर्‍यांशी चर्चा न करताच नोटीसा
बारामती-फलटण-लोणंद रेल्वे मार्गाची गेल्या अनेक वर्षापासूनची नागरीकांची मागणी आहे. या मार्गातील लोणंद ते फलटण मार्गाचे काम पूर्ण झालेले आहे. या मार्गावर रेल्वेची चाचणी देखील यशस्वी झालेली आहे. पुढील फलटण बारामती या रेल्वे मार्गाचे काम अपूर्ण असून हा मार्ग बागायती शेतजमिनीतून जात असल्याचे कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगितले आहे. या मार्गाबाबत शेतकर्‍यांशी चर्चा न करताच भूसंपादनाच्या नोटीसा पाठविल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. ज्या शेतकर्‍यांच्या जमीनी संपादीत होणार आहेत त्यांना नवीन कायद्यानुसार जमिनीचा मोबदला धनादेश दिला जाणार असून खरेदी खतामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख केला जाणार आहे, असा दावा सरकारच्यावतीने करण्यात येत आहे.