मुंबई : माझ्यासारख्या विचारवंत माणसाला अटक होऊन जर पोलिसांकडून अशी अवस्था होऊ शकते तर सामान्य माणसाची व कार्यकर्त्याची अवस्था काय असेल, असे मत सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे हे अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष संजय परब आणि सुधाकर काश्यप हे देखील याप्रसंगी उपस्थित होते.
आपले मन मोकळे करताना डॉ. तेलतुंबडे म्हणाले की, मी एका छोट्याशा खेड्यातून शिक्षणास प्रारंभ केला. जगातील सर्व नामांकित विद्यापीठात शिक्षण घेतले. भीमा-कोरेगाव व एल्गार परिषदेशी माझा काही संबंध नसताना माझ्यावर कारवाई झाली. याबाबत तुम्ही कुणाला जबाबदार धराल असा प्रश्न विचारला असता तेलतुंबडे यांनी कुणाचेही नाव घेतले नाही. मात्र न्यायसंस्थेवर माझा विश्वास असून मला न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयाचा स्थगितीचा आदेश डावलून आपल्याला अटक झाली हे निदर्शनास आणून देत डॉ. तेलतुंबडे म्हणाले की, तीच परिस्थिती सामान्य माणसाबाबत व कार्यकर्त्याबाबत होऊ शकते. हा प्रकार माझ्या विरूद्ध नसून सगळ्या भारतीयांच्या विरोधात आहे. कोणीतरी पत्र लिहितो आणि कोणालाही आरोपी ठरवतो हे योग्य नाही. यु ए पी ए सारख्या कठोर कायद्यांतर्गत मला अटक केली जाते. मात्र माझ्यावर जे काही आरोप करण्यात आले त्यात जराही तथ्य नाही, असे तेलतुंबडे म्हणाले.
अमेरिकन विद्यापीठाच्या निमंत्रणावरून 2018 ला मी पॅरिसला गेलो होतो. त्या दौर्याचा खर्च त्या विद्यापीठाने केला होता. त्याचा माओवाद्यांशी काहीही संबंध नाही. माओवाद्यांनी त्या दौर्यासाठी अर्थपुरवठा केला हे साफ खोटे आहे, असेही डॉ. तेलतुंबडे म्हणाले. प्रारंभी अध्यक्ष वाबळे यांनी डॉ. तेलतुंबडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संघाचे उपाध्यक्ष संजय परब यांनी आभार मानले.