नवी दिल्ली । ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा पदक जिंकणारा कुस्तीपटू सुशील कुमार याच्या विरोधात मारहाण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.कुस्तीपटू प्रवीण राणा आणि त्याचा भाऊ नवीन राणा यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी आयपी स्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि वरिष्ठ गटाच्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी दिल्लीच्या खाशबा जाधव स्टेडीयमवर शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या निवड चाचणी दरम्यान, प्रवीण राणा आणि सुशील कुमार यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. या वादातूनच सुशीलकुमारविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, डीसीपी सेंट्रल एम.एम. रंधावा यांनी सांगितले की, सुशील कुमार आणि त्याच्या समर्थकांविरोधात तक्रार दाखल करणयात आली आहे. पोलिसांनी भा.दं.सं. 323 आणि 341 अन्वये सुशील कुमार याच्याविरोदात तक्रार दाखल केली आहे. या कलमान्वये दोषी ठरल्यास, एक वर्षाची शिक्षा, एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही लागू केले जाऊ शकते.
जुने वैर उफाळून आले
सुशील कुमार आणि त्याच्या समर्थकांच्या दाव्यानुसार, राणाने कुस्ती सुरु असताना त्याच्या डोक्यावर मारले. तसेच हाताचा चावा घेतला. त्यावरुनच दोघांच्या समर्थकांमध्ये हाणामारीला तोंड फुटले. कुमार म्हणाला की, त्याने मला मारले, पण काही हरकत नाही. मला चांगले खेळण्यापासून परावृत्त करण्याची त्याची रणनीती असावी. हा खेळाचा एक भाग आहे. जे काही झाले ते चुकीचे होते. मी याचा निषेध व्यक्त करतो. सामना संपल्यानतंर आमच्या मनात एकमेकांबद्दल आदर होता. या विधानानंतरच दोन्ही पैलावानांचे समर्थक भिडले. दरम्यान सुशीलकुमार आणि प्रवीण राणा यांच्यातील वैर जुने आहे. सुशील कुमार समर्थकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. तसंच आगामी प्रो कुस्ती लीगमध्ये न खेळण्याची धमकीही दिली, असा आरोप प्रवीण राणाने केला आहे. इतकंच नाही तर सुशीलच्या समर्थकांनी रिंगमध्ये त्याच्याविरोधात उरतल्याने मला आणि माझ्या मोठ्या भावाला मारले, असा दावाही राणाने केला आहे.