तर सुसंस्कृत समाज निर्माण होईल : प्रतिभाताई पाटील

0

पुणे । कर्तृत्ववान पुरुषांच्या मागे असणार्‍या त्यांच्या पत्नींचे कार्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकदा स्त्रियांना गृहीत धरले जात नाही. त्यांच्या कामाची गणना होत नाही. तरीही त्या काम करीत असतात. आपलेपणाची भावना स्त्रियांमध्ये आहे. त्यामुळेच कुटुंबाला त्या बांधून ठेवतात. ही आपलेपणाची भावना आणि संस्कार जर समाजात रुजविले, तर सुसंस्कृत समाज निर्माण होईल, असे मत भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले.

श्री भवानी प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त नवी पेठेतील पत्रकार भवन येथे विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या पत्नींचा स्त्री शक्ती सन्मान जागर पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. पं. वसंतराव गाडगीळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत जाधव, डॉ. शैलेश गुजर, सचिव अरविंद जडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यांचा झाला सत्कार
वैशाली माशेलकर, अनुराधा संचेती, अनुराधा पवार, शारदा गोडसे, ज्योत्स्ना एकबोटे, निलीमा देसाई, अंजली परदेशी, ज्योती माडचेड्डी, वर्षा पवार, मनिषा खेडेकर, वैशाली खटावकर, कल्याणी सराफ, अमिता आगरवाल, गीता गोयल, सुशिला मर्लेचा यांचा सत्कार करण्यात आला. मानपत्र, साडीचोळी, पुस्तके आणि फळांची परडी देऊन या कर्तृत्ववान स्त्रियांना सन्मानित करण्यात आले.

महिलांच्या नेतृत्वाची गरज
राजा राममोहन राय, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांची परिस्थिती बदलली. स्त्रियांची परिस्थिती बदलण्यासाठी पुरुषांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कायद्यामुळे आज स्त्रियांच्या परिस्थितीत खूप बदल झाला आहे. देश सुरळीत चालण्यासाठी पुरुषांप्रमाणेच महिलांच्या नेतृत्वाची गरज आहे, असे प्रतिभाताई पाटील यांनी यावेळी सांगितले.

पालिकेने असे कार्यक्रम राबवावेत
प्राचीन काळापासूनच स्त्रियांना अतिशय महत्त्व देण्यात आले आहे. कर्तृत्ववान पुरुषांचा सन्मान नेहमीच करण्यात येतो. परंतु त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या असणार्‍या महिलांचा सन्मान देखील व्हायला हवा. केवळ पुण्यातच नाही तर, देशभर हा कार्यक्रम व्हावा आणि पुणे महानगरपालिकेने स्त्री शक्ती जागर हा कार्यक्रम पालिकेतर्फे राबवावा, अशी इच्छा पं. वसंतराव गाडगीळ यांनी यावेळी व्यक्त केली.

स्त्रियांचा सन्मान ही भारताची परंपरा
स्त्रियांचा सन्मान ही भारताची परंपरा आहे. स्त्रिया या मुळातच बुद्धीमान असतात. सर्व क्षेत्रात त्या आज पुढे गेल्या आहेत. स्वत:कडे दुर्लक्ष करून त्या कुटुंबाची काळजी घेतात. त्यामुळे अशा महिलांचा सन्मान केल्याबद्दल अतिशय आनंद होत असल्याची भावना ज्योत्स्ना एकबोटे यांनी पुरस्काराला उत्तर देताना व्यक्त केली. डॉ. शैलेश गुजर यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार उल्हास पवार यांनी आभार मानले.