सदाभाऊ खोत : जिल्हास्तरीय दौंड कृषी महोत्सव प्रदर्शनाला भेट
यवत । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे आदेश दिले तर निवडणूक लढवीन. बहुजन समाजाचा खासदार या मतदार संघाला हवा आहे. खासदार राजू शेट्टी यांनी सतत बहुजन समाजाचा वापर व अपमान केल्याने त्या अपमानाचा बदला हातकणंगलेची जनता नक्की घेईल, असे मत राज्याचे कृषी, फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. दौंड तालुका कृषी उत्पादक व प्रक्रिया सहकारी संस्था तसेच महाराष्ट्र प्रदेश भाजपा किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय दौंड कृषी महोत्सव प्रदर्शनाला खोत यांनी रविवारी भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपली दिशा स्पष्ट केली. त्यामुळे भविष्यात सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्यातील संघर्ष पुढील काळात वाढणार असल्याचे दिसत आहे.
खोत यांनी घेतला हल्ल्याचा समाचार
चळवळीतील कोणीही मोठे झालेले त्यांना सहन होत नाही. ते आत्मकेंद्रित झाले आहेत. त्यांची भाषा पाहिल्यावर ते वैफल्यग्रस्त झाल्याचे स्पष्ट होते. या शब्दात राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या ताफ्यातील गाडीवरील हल्ल्याचा व गाजर व निषेधाचा समाचार घेतला. पाचच कार्यकर्ते आंदोलन करतात का? 400-500 लोकांचा गट आंदोलन करत असता तर मान्य होते. ज्या कार्यकर्त्याने गाडीची काच फोडली त्याच कार्यकर्त्याच्या गावात ढोल ताशे लावून स्वागत झाले व मोठी सभा झाली, याला तुम्ही काय म्हणणार. राजू शेट्टी हे व्यक्तिगत द्वेषाने पेटले आहेत. त्यांना बहुजन कार्यकर्ता मोठा झालेला पाहायचा नाही. असेच चालले तर राजूशेट्टींना बहुजन समाज मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असे खोत यांनी पुढे सांगितले.
पवारांमुळे सिंचनाचे वाटोळे
एखाद्या दुसर्या कार्यकर्त्याला भडकावून तो शेतकर्यांचा संताप आहे, असे दाखवण्याचा हा प्रयत्न असल्याचे खोत म्हणाले. महाराष्ट्राच्या शेती व सिंचनाचे वाटोळे पवार यांच्यामुळे झाले असे सगळीकडे सांगणारे शेट्टी यांना आता साक्षात्कार झाला आहे. ते जाणकार वाटू लागले आहेत. राजू शेट्टी यांनी जरूर राष्ट्रवादीबरोबर घरोबा करावा पण गोळीबारात व लाठीमारात मृत्यू पावलेला शेतकरी व तरणाबांड मुलगा त्या शेतकरी कुटुंबाला परत द्यावा. राजू शेट्टींमुळे मी मंत्री झालेलो नाही माझे चळवळीला योगदान असल्याचे खोत म्हणाले.