…तर हार्दिकचा काँग्रेसला मदतीचा हात

0

अहमदाबाद । गुजरातमध्ये भाजप सरकारवर नाराज असणारे पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी राज्यात होणार्‍या आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी गुजरात काँग्रेसकडे सत्तेत आल्यास पाटीदारांना काय मिळेल? अशी विचारणा केली आहे. याप्रकरणी राज्य काँग्रेस अध्यक्ष सोलंकी यांनी पाटीदारांबाबत सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे म्हटले आहे.

हार्दिक पटेल यांनी काँग्रेस नेत्यांशी घेतलेल्या भेटीमुळे पाटीदार आरक्षण आंदोलन समितीच्या काही नेत्यांमध्ये मतभेद दिसून आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पाटीदार आंदोलन समितीचे संयोजक असणार्‍या हार्दिक पटेल यांनी आपली रणनीती आखली आहे. हार्दिक यांनी आपले सहकारी दिनेश बामणिया, मनोज पनारा तसेच वरुण पटेल यांना राज्य काँग्रेस अध्यक्ष भरतसिंग सोलंकी यांच्याकडे पाठवत चर्चा घडवून आणली आहे. या चर्चेत काँग्रेस सत्तेवर आल्यास पाटीदारांना आरक्षण, आंदोलनावेळी मारले गेलेल्या 14 युवकांच्या कुटुंबीयांना भरपाई आणि सरकारी नोकरी, गोळीबाराप्रकरणी दोषी पोलीस अधिकार्‍यांना शिक्षा मिळवून देणे या मागण्या पटेल यांच्याकडून ठेवण्यात आल्या आहेत. हार्दिक निवडणुकीवेळी काँग्रेसचा प्रचार करतील, अशी चर्चा आहे. तर काँग्रेसशी वाढत्या जवळीकीला आंदोलनाच्या काही नेत्यांनी उघड विरोध दर्शविला आहे. या नेत्यांनी राजकीय पक्षांची भेट घेणारी आंदोलनाची सुकाणू समिती भंग करावी, अशी मागणी केली आहे.