भाजपने मिळवलेला विजय देदिप्यमान आहे यात शंका नाही. 1980 साली पक्षाची स्थापना झाल्यानंतर कोणत्याही निवडणुकीत भाजपला एवढा मोठा विजय मिळाला नव्हता. लोकसभा- विधानसभा निवडणुकीत विजय नरेंद्राचा होता, तर यंदा तो देवेंद्राचा आहे. मजबूत अर्थबळ, इतर पक्षांतून आयात केलेलं बाहुबळ आणि स्वत:ची स्वच्छ प्रतिमा या भांडवलावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीची जी रणनीती आखली तिला तोड नाही. या प्रखर हल्ल्यापुढे विरोधक अक्षरश: जमीनदोस्त झालेले दिसतात. शिवसेनेची मुंबई- ठाण्यात लाज तरी राहिली, पण काँग्रेस- राष्ट्रवादीची तर मोठ्या शहरांमध्ये लक्तरंच निघाली. जिल्हा परिषदेतही हे पक्ष खाली ढकलले गेले. या पराभवाचा परिणाम म्हणून शरद पवारांना पुन्हा एकदा काँग्रेस- राष्ट्रवादीने एकत्र येण्याचं आवाहन करावं लागलं. पण काँग्रेसने अजून त्याला प्रतिसाद दिलेला नाही.
अर्थात, अशा तात्पुरत्या तडजोडीमुळे भविष्याची बेगमी मात्र होणार नाही. भाजपची घोडदौड रोखण्यासाठी विरोधकांना नेमकी रणनीती आखावी लागेल. नाहीतर, 2019च्या निवडणुकीतही भाजपचंच कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही. आजवर काँग्रेस- राष्ट्रवादीने आपल्या 2014च्या पराभवाचा सांगोपांग विचार केलाय असं दिसत नाही. या दोन्ही पक्षांची विश्वासार्हता पार रसातळाला गेली आहे. विरोधी पक्ष म्हणून त्यांची कामगिरी निराशाजनक आहे. भ्रष्टाचाराचा कलंक अजून दूर झालेला नाही. राष्ट्रवादीचे एक बडे नेते छगन भुजबळ थेट तुरुंगात आहेत. गेल्या अडीच वर्षांत असं काहीही घडलेलं नाही की मतदारांनी या दोन पक्षांवर विश्वास टाकावा. उलट, या पक्षाचे नेते स्वत:च्याच मस्तीत वावरत आहेत. यंदाच्या निवडणुकीत याच मस्तीला मतदारांनी फटका दिला आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट सिटीचं स्वप्न सर्व शहरांना विकलं. ‘माझा शब्द आहे,’ असं निक्षून सांगत देवेंद्र यांनी मतदारांच्या मनात विश्वास निर्माण केला. विरोधकांचा एकही आरोप टिकला नाही. मतदारांनी देवेंद्र फडणवीस यांना एक संधी द्यायचा स्पष्ट निकाल दिला.
शिवसेनेची परिस्थिती थोडी वेगळी आहे. त्यांच्यासाठी मुंबई- ठाण्यातली निवडणूक यावेळेला प्रतिष्ठेची होती. एक तर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्यानंतरची ही पहिलीच पालिका निवडणूक. त्यात 25 वर्षांत पहिल्यांदाच सेना आणि भाजप वेगवेगळे लढले. दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेनेने मुंबई- ठाण्यात आपले बालेकिल्ले टिकवले असले तरी भाजपच्या मुसंडीपुढे त्यांचा हा विजय झाकोळला गेला. 2012च्या निवडणुकीत भाजपने मुंबईत 31 जागा जिंकल्या होत्या, त्यावरून त्यांनी चक्क 82वर उडी मारली. सेनेच्या तुलनेत हा विजय लक्षणीय आहे आणि सेनेला धोक्याचा इशाराही आहे. शिवसेना सर्वसमावेशक न झाल्यास यापुढे तिची वाढ होणार नाही हे भाजपला मतं देणार्या अमराठी मतदारांनी दाखवून दिलं आहे. म्हणूनच पुढच्या निवडणुका स्वबळावर जिंकायच्या असतील तर उध्दव ठाकरेंनाही स्वत:च्या हस्तिदंती मनोर्यातून बाहेर येऊन वेगळा विचार करायला लागेल. विधानसभेच्या निवडणुकीत मोदी लाट असताना सेनेने 63 जागा जिंकल्या होत्या. ती कामगिरी उल्लेखनीय होती. यंदाही मनसेची साथ असती तर शिवसेनेच्या किमान 15 ते 20 जागा वाढल्या असत्या. पण व्यक्तिगत अहंकार युतीच्या आड आला आणि फायदा झाला तो भाजपचा. या पुढे शिवसेना- मनसे असो की काँग्रेस- राष्ट्रवादी, सर्वच विरोधी पक्षांना भाजप विरोधात एकवटण्याचा विचार करावा लागेल. मगच भाजपच्या अश्वमेधाचा घोडा थांबवणं शक्य होईल.
या देशात डॉ. लोहियांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून काँग्रेस विरोधी राजकारणाची मुहुर्तमेढ रोवली. त्याची फळं 1967 आणि 1977च्या लोकसभा निवडणुकीत दिसली. आता राजकारणाचा पट एवढा बदलला आहे की भाजपला रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या भाजप विरोधी पक्षांना एकत्र येण्यावाचून पर्याय नाही. बिहारमध्ये नितिश- लालू- काँग्रेस यांनी एकत्र येऊन महागठबंधनाचे परिणाम दाखवले. उत्तर प्रदेशातही अखिलेश यादव आणि राहुल गांधी एकत्र आल्यामुळे भाजपपुढे चांगलं आव्हान उभं राहिलं आहे. महाराष्ट्रही याला अपवाद कसा असेल? शरद पवार नेहमी म्हणतात त्याप्रमाणे, पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ पॉसिबिलिटीज. राजकारणात सर्व शक्यतांचा विचार करावा लागतो. भाजपला कोंडीत पकडायचं असेल, तर शिवसेनेलाही काँग्रेस- राष्ट्रवादीबरोबर आपले संबंध काय राहतील, मनसेशी आपण कोणती जुळणी करणार आहोत याचं चिंतन करणं भाग आहे. शिवसेनेचा जन्मच काँग्रेसच्या राजकारणातून झाला आहे. 1978च्या मुंबई महापौराच्या निवडणुकीत जनता पक्षाविरोधात काँग्रेसचे मुरली देवरा सेनेच्या पाठींब्यावर विजयी झाले होते. नंतर सेनेचे वामनराव महाडिकही काँग्रेसच्या समर्थनाने महापौर बनले. गेल्या काही वर्षांत शिवसेना पूर्णपणे काँग्रेस विरोधावर वाढली असली, तरी भाजपला शह द्यायचा असेल तर शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे विसरून चालणार नाही. म्हणूनच राज्याच्या भावी राजकारणाच्या पटाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बुद्धीबळाच्या आणि बाहुबळाच्या खेळात भाजप यशस्वी होतो की विरोधक याचं उत्तर काळच देईल.