जळगाव । शहरातील कांचन नगरातील सद्गुरू किरणा दुकानावर सोमवारी सकाळी 11.30 वाजता तलवार घेऊन उभा असलेला एक युवक दहशत माजवत होता. त्याला शनिपेठ पोलिसांनी 12.15 वाजेच्या सुमारास अटक केली. त्याच्याजवळून शनिपेठ पोलिसांनी एक तलवार जप्त केली आहे. यावेळी युवकाविरूध्द शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास शनिपेठ पेठ पोलिस ठाण्याचे पोना. जितेंद्र सदाशिव सोनवणे, मोतीलाल पाटील, नरेश सपकाळे, अनिल धांडे, मिलींद कंक, योगेश वाघ, अमित बाविस्कर, गणेश गव्हाळे अशांचे पथक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत होते.
अशांनी केली कारवाई; तलवार जप्त
सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास कांचनगरात गस्त घालत असतांना सद्गुरू किराणा दुकानाजवळ त्यांना गर्दी जमलेली दिसली. त्यामुळे पथक त्या ठिकाणी थांबले असता त्यांना भुषण दिलीप सपकाळे (वय-19. रा. कांचननगर) हा युवक हातात तलवार घेवून उभा होता. यावेळी पोहेकॉ. मोतीलाल पाटील, अनिल धांडे यांनी दहशत माजविणार्या भुषणला जागीच पकडले. यानंतर त्याच्या हातातून तलवार जप्त केली. यानंतर भुषण सपकाळे या युवकाला पोलिस ठाण्यात नेत त्याच्यावर आर्म अॅक्ट 4/25 तसेच जिल्हाधिकारी यांनी जारी केलेले आदेश मंबई पोलिस अॅक्ट क. 37 (1) (3)चे उल्लंघन क. 135 प्रमाणे पोना. जितेंद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरून कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे.