भुसावळ- किरकोळ कारणावरून एकावर तलवार हल्ला केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील माजी नगरसेवक संतोष बारसेंसह चौघांची निर्दोष सुटका करण्यात आली. भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचे न्या.एस.पी.डोरले यांनी सोमवारी हा निकाल दिला. या गुन्ह्यातील फिर्यादीसह साक्षीदारांनी आरोपींविरूद्ध कुठलाही जवाब दिला नाही हे विशेष !
अशी घडली होती घटना
12 एप्रिल 2015 रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जामनेर रोडवरील हॉटेल रंगोलीतून जेवण करून बाहेर पडलेल्या फिर्यादी जितेंद्र प्रकाश पवार (भुसावळ) यांच्यावर चौघांनी तलवार हल्ला केल्याचा आरोप होता. या प्रकरणी संतोष मोहन बारसे, नटवरलाल उर्फ नट्टू चंडाले, कुणाल राजू कणवाल, शैलेंद्र मनोज बारसे यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुरनं.74/15, भादंवि कलम 307, 34, आर्म अॅक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल होता. संशयीत आरोपी संतोष व नटवरलाल, शैलेंद्र यांची जामिनावर सुटका झाली होती तर कुणालला अटकपूर्व जामीन मंजूर होता. सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. सात साक्षीदार तपासण्यात आले मात्र फिर्यादी व साक्षीदारांनी आरोपींविरुद्ध जवाब न दिल्याने सकृतदर्शनी पुरावा नसल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीतर्फे अॅड.जगदीश कापडे, अॅड.स्वाती कापडे तर सरकारतर्फे अॅड.विजय खडसे व अॅड.एस.डी.सोनवणे यांनी काम पाहिले.