तलाकची पुरोगामी शोकांतिका

0

तलाक ही मुस्लीम समाजातील घटस्फोटाची साधी सरळ पद्धत आहे. त्यात पत्नीला तीनदा तलाक असे शब्द उच्चारून पती आपल्या वैवाहिक जीवनातून हद्दपार करू शकतो. त्यानंतर त्या विवाहितेला कुठेही दाद मागता येत नाही. कारण तशी धार्मिक कायद्यात व नियमात तरतूद आहे. त्याला नेहमी शरियतचा आधार घेतला जातो. शरियत हा इस्लामी कायदा असल्याचे मानले गेले असल्याने, तशी रुढी-परंपरा दीर्घकाळ चालू राहिलेली आहे. जगातल्या अनेक मुस्लीम देशातही ती परंपरा बेकायदा ठरवली गेली असून, वैवाहिक अन्य कायदे अस्तित्वात आलेले आहेत. म्हणजेच ज्या इस्लाम अधिष्ठित देशात इस्लाम हाच अधिकृत धर्म आहे, तिथेही शरियत अमान्य झालेली आहे. पण, स्वत:ला कायम पुरोगामी वा धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या भारतात मात्र स्वातंत्र्योत्तर सात दशकात त्या अन्यायापासून मुस्लीम महिलांना मुक्ती मिळू शकलेली नाही. त्याचे खापर अर्थातच मुल्लामौलवी वा मुस्लीम धर्ममार्तंडांवर फोडले जाते. पण, वस्तुस्थिती अगदी भिन्न आहे. मुस्लीम म्हणजे मतांचा गठ्ठा, हे तत्त्व पत्करल्यामुळे भारतातल्या पुरोगामी पक्ष व विचारवंतांनी कधीही मुस्लीम धर्मांधांना दुखावण्याची हिंमत केलेली नाही किंबहुना इस्लामी धर्मांधता म्हणजे धर्मनिरपेक्षता, अशी आता पुरोगामित्वाची व्याख्या होऊन गेली आहे. परिणामी, मुस्लीम महिला त्यात पिचल्या आहेत आणि त्यांना न्यायाची अपेक्षा कुठूनही करायला जागाच शिल्लक ठेवलेली नाही. वास्तविक असे काही अन्याय झाल्यास त्याच्या विरोधातला आवाज उठवणार्‍या वर्गाला पुरोगामी संबोधले जाते. पण भारतात त्याच चळवळीने मुस्लीम महिलांचा पुरता मुखभंग करून टाकला आहे. त्यातली शोकांतिका अशी, की आज हा विषय ऐरणीवर आलेला असून, उंबरठा ओलांडलेल्या मुस्लीम महिलांनी दाद मागितली आहे, ते दोन्ही नेते हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जातात.

गेल्या काही महिन्यांत सुप्रीम कोर्टात तलाक पीडित महिलांची याचिका विचारार्थ आल्यानंतर हा विषय गाजू लागला. कारण कोर्टाने केंद्र सरकारला त्याविषयात आपले मत कळवायला सांगितले होते. त्याचप्रमाणे अनेक संबंधितांचीही मते मागवली होती. मुस्लीम महिलांच्या सुदैवाने हा विषय कोर्टात आला असताना देशात पुरोगामी वा धर्मनिरपेक्ष मानल्या जाणार्‍या कुठल्या पक्षाचे सरकार नाही. तितकेच नाही, नशिबाची गोष्ट म्हणजे सध्या देशात तथाकथित हिंदुत्ववादी सरकार सत्तेत बसले आहे. म्हणूनच तलाक पीडित महिलांबाबतीत सहानुभूतीची भूमिका शासकीय पातळीवर घेतली गेलेली आहे. पण गंमत बघा, तेवढ्यानेच या पीडित मुस्लीम महिलांमध्ये क्रांतीचे बीज पेरले गेले आहे. तीन दशकांपूर्वी असाच प्रसंग आला असताना, मूठभर मुस्लीम पीडित महिला आपल्या घराचा उंबरठा ओलांडू शकल्या नव्हत्या. शहाबानु नावाच्या वृद्धेने न्यायालयीन प्रदीर्घ लढा देऊन नवर्‍याच्या विरोधात निकाल मिळवला आणि पोटगीचा अधिकार प्राप्त करून घेतला होता. तेव्हा तमाम मुल्लामौलवी व धर्ममार्तंड रस्त्यात उतरले आणि त्यांनी त्या निकालाचा कडाडून विरोध केला होता. त्याला घाबरून पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुप्रीम कोर्टाचा निकाल पुसून टाकणारा कायदाच संमत करून घेतला. तलाकपीडित मुस्लीम महिलेला पोटगी देण्याचा विषय नवर्‍याच्या डोक्यावरून काढून, वक्फ बोर्डाकडे सोपवण्यात आला आणि शहाबानूच्या ऐतिहासिक विजयावर बोळा फिरवला गेला. संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड बहुमत असूनही पंतप्रधान लेचापेचा असल्याने, मुस्लीम महिलांना मिळालेला न्याय उलटा फिरवला गेला होता. मूठभर मुस्लीम महिलाही शहाबानूच्या न्यायासाठी घराबाहेर पडू शकल्या नव्हत्या. पण, आज नुसती याचिका कोर्टात आली असताना, देशाच्या कानाकोपर्‍यातून मुस्लीम महिला न्यायासाठी उंबरठा ओलांडण्याचे धैर्य करू शकल्या आहेत. पुरोगामी दहशतीतून बाहेर पडत आहेत.

आज काँग्रेस वा कुठल्याही सेक्युलर पक्षाचे सरकार दिल्लीत असते, तर इतका चमत्कार घडू शकला नसता. वास्तविक धार्मिक वा सामाजिक रुढी-परंपरांच्या विरोधातला लढा चालवतात, त्यांना पुरोगामी संबोधले जाते. अशा परंपरांनी गांजलेले पीडित अशा पुरोगाम्यांकडे न्यायासाठी धाव घेतात असाच प्रघात आहे. पण, आज त्यातही किती आमूलाग्र बदल झाला आहे? ते आपण बघत आहोत. ज्यांच्यावर गेल्या दोन दशकात अहोरात्र मुस्लीम विरोधक वा मुस्लिमांचे शत्रू असा आरोप होत राहिला, अशी दोन माणसे म्हणजे नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ, हे होत. पण, आज तलाकपीडित मुस्लीम महिला अतिशय विश्‍वासाने त्यांचेच दार न्यायासाठी ठोठावत आहेत. त्या महिला योगी वा मोदींना पत्रे लिहून न्यायाची मागणी करीत आहेत. रस्त्यावर येऊन त्याच दोघा नेत्यांकडे न्याय मागत आहेत. पण, त्यापैकी एकाही मुस्लीम महिलेला कुणा पुरोगामी धर्मनिरपेक्ष नेता वा पक्षाकडे न्यायासाठी धाव घेण्याची इच्छा झालेली नाही किंबहुना तसा विचारही कुणा मुस्लीम महिलेच्या मनाला शिवलेला नसावा, ही मोठी चमत्कारिक गोष्ट नाही काय? हिंदू धर्मनिष्ठांकडे मुस्लीम पीडित महिलेने न्याय मागावा, हा विरोधाभास नव्हे काय? तर त्याचेही कारण समजून घ्यावे लागेल. ते कारण सरळ आहे. या तलाकपीडित वा धर्मपीडित मुस्लीम महिलांचे शोषणकर्तेच मुल्लामौलवी आहेत आणि त्यांचे खरे पाठीराखे आज पुरोगामी पक्ष व नेतेच होऊन बसलेले आहेत. म्हणजेच त्या पीडित मुस्लीम महिलांना मुस्लीम धर्मांध व पुरोगामी यात तसूभरही फरक वाटेनासा झाला आहे. म्हणूनच अशा धर्मनिरपेक्षांकडे न्याय मागणे मुस्लीम महिलांना आत्महत्याच वाटली तर नवल नाही. त्यामुळेच पुरोगामी संघटना, पक्ष वा नेत्यांकडे त्यापैकी एकही महिला तलाकबंदीची मागणी घेऊन गेलेली नाही. ही पुरोगामित्वाची शोकांतिकाच नव्हे काय?

आज भारतातले पुरोगामी तलाकविषयी ठाम भूमिका घेऊन पुढे येऊ शकलेले नाहीत. वास्तविक पन्नास वर्षांपूर्वी तत्कालीन समाजवादी व उदारमतवादी राजकारणात समान नागरी कायदा ही प्रमुख मागणी होती. पण, पुढल्या काळात मौलवींच्या फतव्यावर मुस्लीम मतांचा गठ्ठा पदरात पाडून घेण्याच्या आहारी गेलेल्या पुरोगाम्यांनी मुस्लिमांच्या सामाजिक सुधारणांना टांग मारली आणि मौलवींनाच पुरोगामी ठरवून टाकले. याच धर्ममार्तंडांच्या तालावर पुरोगामी मर्कटलीला करू लागले. लाखो मुस्लीम मुली, महिला तलाकच्या अन्यायामुळे देहविक्रयाच्या बाजारात ढकलल्या जात असतानाही, त्याकडे कानाडोळा करून बाबरीसाठी शोकाकुल होण्यात पुरोगाम्यांनी धन्यता मानली. त्याच्याच परिणामी अर्ध्या मुस्लीम लोकसंख्येच्या मनातून पुरोगामी उतरून गेले आहेत. मोदी-शहा जोडगोळीने आपल्या निवडणूक रणनीतीमध्ये त्याचा इतका शिताफीने वापर करून घेतला, की मुस्लीम व्होटबॅक दिवाळखोरीत गेली आणि तिच्याबरोबर मुस्लीम समाजाची मक्तेदारी सांगणार्‍या मुल्लामौलवींचा मुस्लिमांवर कायम राखलेला धाकही विस्कटून गेला आहे. मुस्लीमधार्जिणे पक्ष मौलवींच्या मुस्लीमबहुल भागातच पराभव झाल्याने, या पीडित मुस्लीम महिलांना धीर मिळाला आहे. खर्‍या अर्थाने देशात धर्मनिरपेक्ष न्याय मिळू शकतो, असा आत्मविश्‍वास या महिलांमध्ये संचारला आहे. त्यातूनच मोठ्या संख्येने या पीडित महिला घराबाहेर पडायला लागल्या आहेत. आजवरचे भ्रम झुगारून अगदी भाजपाच्या गोटातही वावरू लागल्या आहेत. या महिलांनी नुसती मौलवींची मक्तेदारी नाकारलेली नाही, त्यांनी पुरोगामी थोतांडही फेटाळून लावले आहे. म्हणूनच त्यापैकी कोणीही तलाकपीडिता कुणा पुरोगाम्याकडे फिरकलेली नाही. स्वयंभूपणे वा मोदींकडे न्याय मागण्यापर्यंत त्यांनी धैर्य दाखवले आहे. यासारखी पुरोगामित्वाची अन्य कुठली शोकांतिका असू शकत नाही.