नवी मुंबई । नवी मुंबई महापालिका हद्दीमध्ये प्रत्येक विभागाविभागात तलाठी कार्यालये आहेत. ही कार्यालये मनपाच्या विभाग कार्यालयात आहेत किंवा अशा ठिकाणी आहेत की जिथे नागरिकांना दिसतच नाहीत. परंतु, घणसोली येथील कार्यालय अशा ठिकाणी आहे ते सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीस पडत नाही. ते एका खासगी इमारतीमध्ये असून ते कोणत्याही नागरिकांना माहितीही नाही. यामुळे महा ई-केंद्र चालकांचे चांगभले झाले असून, नागरिकांना नाहक भुर्दंड पडत आहे. त्यामुळेच हे तलाठी कार्यालय मनपाच्या घणसोली विभाग कार्यालयात आणावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
साधारणत: तीन वर्षांपूर्वी घणसोली तलाठी कार्यालय पालिकेच्या घणसोली विभाग कार्यालयात होते. त्या वेळी तलाठी असणारे पाटील कार्यालयात नियमित येत असत. त्यानंतर त्यांच्याच कालावधीत हे कार्यालय पालिका विभाग कार्यालयाच्या शेजारी असणार्या मच्छिंद्र म्हात्रे पाटील यांच्या इमारतीतील पहिल्या माळ्यावर गेले.
याबाबत तहसीलदार कार्यालयाचे कक्ष अधिकारी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, तलाठी कार्यालय खासगी जागेत असल्याबाबत वरिष्ठांना सांगून पुढचा निर्णय घ्यावा लागेल, तर सध्या कार्यालयाचा बोर्ड नाही. त्यामुळे या ठिकाणी तत्काळ बोर्ड लावला जाईल. तलाठी जाधव या जर कार्यालयात थांबत नसतील तर त्यांना थांबण्याचे आदेश देण्यात येतील. नागरिकांशी त्या व्यवस्थित बोलत नसतील तर त्यांना लगेचच समज
देण्यात येईल, असे जाधव यांनी सांगितले.
शासकीय कामासाठी अडचण
नागरिकांना तहसील विभागाशी अनेक कामे असतात. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, स्थानिक वास्तव्याचा दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला तसेच इतरही महत्त्वाचे दाखले काढण्यासाठी तलाठी महत्त्वाचा दुवा ठरतो. घणसोलीतील तलाठी खासगी कार्यालयात बसलेला असतो किंवा इतरत्र कामासाठी गेलेला असतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भेटत नसल्याचे नागरिक संजय मुर्बाडे यांनी सांगितले. जे काम तलाठी भेटल्यानंतर शासकीय दरानुसार 25 ते 50 रुपयांमध्ये होत आहे. त्याच कामाकरिता महा ई सेवा केंद्राकडून 300रुपये घेतले जातात. त्यामुळेच तलाठी समुदायाचा अधिकाधिक संपर्क याच केंद्राशी दिसत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. महा ई-सेवा केंद्राला शासनाचीच मान्यता आहे. परंतु, आमची कामे आम्ही स्वत: करणार असेल तर किमान तलाठी आम्हाला भेटला तर पाहिजे ना? असा सवाल नागरिक व्यक्त करत आहेत.
भाड्याचे कार्यालय कशाला
घणसोली विभागासाठी एक महिला तलाठी नियुक्त केली आहे. या तलाठी केव्हा येतात व जातात हे कुणालाही कळत नाही. त्या अनेकदा महा ई-सेवा या खासगी केंद्रावर विराजमान झालेल्या असतात. त्यांचे आणि महा ई-सेवा केंद्राच्या मालकाचे इतके जवळचे संबंध का आहेत, असाही प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यांना शासनांनी भाडे तत्त्वावर कार्यालय दिले असताना तिथे त्यांना जायची गरजच काय, असाही प्रश्न कमल पासवान यांनी विचारला आहे. यामुळे तलाठी कार्यालय पुन्हा मनपा कार्यालयात सुरू करावे, अशी मागणी घणसोली नोडमधील नागरिक करत आहेत. या समस्येसाठी राज्य सरकारकडे जाणार असल्याचे काहींनी सांगितले.