तलाठी झाले दुर्मिळ, सातबारा संगणकीकरणाचा होतोय परिणाम

0

महाड । सातबारा संगणकीकरण कार्यक्रम संपूर्ण राज्यात सुरु आहे. तालुक्यात ग्रामीण भागात दूरध्वनी व इन्टरनेट सुविधा उपलब्ध होत नसल्याने सर्व तलाठ्यांना तालुका स्तरावर एकाच ठिकाणी सातबारा संगणकीकरण करण्यासाठी बसवले आहे. सर्व तलाठी या कामात गुंतले असल्याने तालुक्यातील तलाठी कार्यालये मात्र ओस पडू लागली आहेत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. शासनाला हा कार्यक्रम लवकर पूर्ण करायचा असल्याने व त्यातही अनंत अडचणी येत असल्याने संगणकीकरण कार्यक्रम व ग्रामिण भागातील तलाठी कार्यालयांतील सुविधा दोन्हीही अडचणीत सापडले आहेत.

महाड तालुक्यात सातबारा संगणकीकरण कार्यक्रम गेली चार वर्षापासून सुरुआहे. या कामासाठी शहरातील रमाबाई विहार या ठिकाणी सर्व तलाठ्यांना एकत्रित बसवले आहे. या ठिकाणी नेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन सातबारा अद्ययावत करणे, फेर संपादित करणे अशी कामे यावर केली जात आहेत. हे काम दिवसभर सुरु असल्याने आणि शासनाचे आदेश असल्याने प्रत्यक्ष तलाठी कार्यलयात काम करणे या तलाठ्यांना अशक्य झाले आहे. यामुळे तालुक्यातील अनेक गावातील तलाठी कार्यालये ओस पडली आहेत.

इंटरनेट सुविधा नाही
महाड तालुका दुर्गम असल्याने अनेक तलाठी कार्यालये हि दुर्गम भागात आहेत. या ठिकाणी नेट सुविधा उपलब्ध नाही. अनेक कार्यालयांना तर वीज पुरवठा देखील नाही. यामुळे या कार्यालयात संगणकीय काम होत नाही. सध्याचे युग हे संगणकीय असल्याने महसूल संदर्भातील सर्व कामे ऑनलाईन होत आहेत. यामुळे तलाठी कार्यालय बंद ठेवली जात आहेत. त्यातच कमी तलाठी कर्मचारी आणि गावांची संख्या अधिक यामुळे एका तलाठ्याकडे किमान दोन ते तीन गावांचा कारभार देण्यात आला आहे.तलाठी शासन आणि ग्रामस्थ यांच्या कात्रीत गावातून ना नेट सुविधा ना दुरध्वनी यामुळे सातबारा अद्ययावत काम शहरात एकाच ठिकाणी होत आहे. याकरिता शासन या तलाठी कर्मचार्‍याने प्रतिदिन किती काम केले आहे याचा ऑनलाईन अहवाल देखील तपासत आहे. मात्र याठिकाणी ज्या वेबवर हे काम केले जाते ते संकेतस्थळ कायम मंदावत आहे. यामुळे तलाठी कर्मचार्‍याला एक सातबारा अपडेट करण्यासाठी दिवस जात आहे.

ग्रामस्थाना वारंवार तलाठी कार्यालयात कामासाठी जावे लागत असते. सातबारा संगणकीकरण नागरिकांच्या हितासाठी जरी असले तरी नागरिकांची गैरसोय होऊ नये याकडेही महसूल विभागाने पाहिले पाहिजे. त्यामुळे कामे जलदगतीने होण्यासाठी सर्वरकडे लक्ष दिले पाहिजे.
-विजय मोरे, ग्रामस्थ