तलाठ्यांनी लेखणीबंद आंदोलन मागे घ्यावे

सर्वसामान्यांची मागणी ; दैनंदीन कामे रखडली

अमळनेर प्रतिनिधी-: महसूल पथकावर हल्ला करणार्‍या हल्लेखोरांना अटक व्हावी यामागणीसाठी मागील काही दिवसांपासून तलाठी संघटना लेखणीबंद आंदोलनावर ठाम आहे. या कालावधीत कोवीड संसर्ग व नैसर्गिक आपत्तीची कामे मात्र केली जातील असे घोषित केलेले आहे. याआंदोलनामुळे ऐन खरीपात शेतकरी व सर्वसामान्यांची कामे अडली आहेत. या कालावधीत मात्र वाळू चोरीचा रात्रीचा खेळ हा लपून छपून अव्याहत सुरू असून ‘लेखणीबंद’चा अर्थ काय लावावा असा प्रश्‍न सर्वसामान्यांना सतावतो आहे. मात्र संघटनेच्या या धोरणामुळे सर्वसामान्यांची अडवणूक होत आहे. तलाठ्यांनी लेखणीबंद आंदोलन मागे घ्यावे अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे.
महसूल विभागाच्या पथकाने तालुक्यातील गंगापुरी येथील तापी नदीपात्रात वाळू चोरट्यांवर कारवाई केली होती. ही कारवाई जिव्हारी लागल्याने मुजोर वाळू चोरट्यांनी शहर तलाठी गणेश राजाराम महाजन यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच पथकातील इतरांना मारहाण, शिवीगाळ केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही एक आरोपी मोकाट असल्याने हल्लेखोरांना अटक होईपर्यंत तलाठी लेखणीबंद आंदोलनावर आहेत. दरम्यान, पाच आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आलेली असूनही तलाठ्यांनी अद्याप आंदोलन मागे घेतलेले नाही. वाळू चोरट्यांना गब्बर बनविणारी महसूल विभागातील हीच मंडळी आहे असे पंचक्रोशीतील नागरिकांचे म्हणणे आहे. वाळू चोरटे गावात कोणाला मोजत नाहीत, जुमानत नाहीत तोच इंगा त्यांनी तलाठ्यांना दाखवला. जे झाले त्याचे समर्थन करता येणार नाही, मात्र तलाठी यांच्यावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. खरे पाहिले तर ऐरवी तलाठ्यांमध्येच एकवाक्यता नाही. काही तलाठी गौण खनिज चोरीत सहभागी आहेत अशी चर्चा असून याची योग्य ती माहिती घेऊन त्यांच्यातील कुंपण जर शेत खात असतील तर दोष तरी कोणाला देणार असे म्हणण्याची वेळ आली आहे. असे असल्याने दुसरा गट कारवाईंना वेग देतो असे देखील ऐकिवात आहे. हेतूत: अशा ठिकाणांवर ठरवून कारवाई केली जाते. नविन भरती झालेले तलाठी अनुभवी तलाठ्यांना जुमानता नाहीत असेच चित्र आहे.