यावल। तालुक्यातील 34 पैकी 7 तलाठी सजांचा कारभार प्रभारी आहे. त्यामुळे अन्य तलाठी कर्मचार्यांवर कामकाजाचा अतिरिक्त ताण पडत आहे. नियुक्तीच्या ठिकाणचे कामकाज सांभाळून त्यांना प्रभारी ठिकाणच्या कामकाजाला वेळ द्यावा लागत असल्याने शेतकर्यांना अडचणी येत आहे. सात-बारा संगणकीकरणामुळे कधी तहसिल कार्यालयात तर कधी कार्यक्षत्रातील गावात तलाठीवर्गाला धाव घ्यावी लागते. त्यामुळे शेतकर्यांना तलाठ्यांची शोधाशोध करावी लागते. तालुक्याच्या विधानसभा मतदार संघाचे विभाजन झाल्याने प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही तालुक्याकडे दुर्लक्ष झाले आहे. दोन आमदार असूनदेखील यावल तालुका पोरका झाला आहे.
सात ठिकाणी पदे रिक्त
तालुक्यात एकूण 34 तलाठी सजे आहेत. यापैकी यावल तलाठी कार्यालयात दोन तर तालुक्यातील एकूण 35 तलाठी पदे मंजूर आहेत. मात्र, प्रत्यक्षात केवळ 28 तलाठी कार्यरत आहेत, तर सात ठिकाणी पदे रिक्त असल्याने या सजांचा पदभार अन्य तलाठ्यांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे एका तलाठ्याकजे तीनपेक्षा अधिक गावांचा व्याप आहे. त्यामुळे या तलाठ्यांना एकाच वेळी दोन गावांचा कारभार सांभाळावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यात अडचणी येत आहेत. मे महिन्यात बहुतांश तलाठी मंडळाधिकार्यांच्या बदल्या होतात. त्यामुळे जिल्हास्तरावरून या बदली प्रक्रियेद्वारे तालुक्यात काही प्रमाणात तलाठी मिळतील, अशी अपेक्षा आहे. याकडे आमदार हरिभाऊ जावळे यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.