भुसावळ : तालुक्यातील कुर्हेपानाचे गावातील तलाठ्यासह कोतवालास 240 रुपयांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ अटक केल्याने महसूल वर्गात खळबळ उडाली आहे. शेतकर्याने विकासोचे कर्ज घेतल्यानंतर सातबारा उतार्यावर बोजा लागला मात्र शेतकर्याने कर्जाची परतफेड केल्यानंतर सातबारा उतार्यावरील बोजा कमी करण्यासाठी आरोपींनी 28 डिसेंबर रोजी लाचेची मागणी केली होती तर सोमवार, 8 रोजी प्रत्यक्षात आरोपींनी तलाठी कार्यालयात लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली. तलाठी प्रवीण श्रीकृष्ण मेश्राम (41, रा.सपना नगर, प्रभाकर हॉल जवळ, भुसावळ) व कोतवाल प्रकाश दामू अहिर (45, रा.अंबिका नगर, कुर्हे पानाचे, ता.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
तलाठी कार्यालयात स्वीकारली लाच
तक्रारदार कुर्हे पानाचे गावातील 38 वर्षीय शेतकरी असून त्यांनी त्यांच्या शेतावर गावातील वाजी विकास सोसायटीचे कर्ज घेतलेले होते मात्र कर्ज फेड करण्यात आल्यानंतर त्यांनी सातबारा उतार्यावरील कर्जाचा बोझा कमी करण्यासाठी तलाठी कार्यालयात संपर्क साधला असता आरोपी तलाठी व कोतवाल यांनी 28 डिसेंबर 2021 रोजी पंचांसमक्ष 240 रुपयांची लाच मागितली होती. आरोपींनी सोमवारी लाच घेतात त्यांना तलाठी कार्यालयातून अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाल ठाकुर, पोलिस निरीक्षक निलेश लोधी, संजोग बच्छाव, एएसआय रवींद्र माळी, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार सुरेश पाटील, नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.