जळगाव। चोरटी वाहतुक करुन घेवून जात असतांना वाळुचे ट्रॅक्टर आव्हाणे येथील तलाठी यांनी पकडले. पावती दाखविण्याच्या वादातुन ट्रॅक्टर चालकाने ‘आप्पा बाजुला व्हा, नाहीतर तुम्हाला चाकाखाली घेईल’ असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शहरातील हिराशिवा कॉलनीत सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घडली. आव्हाणे येथील तलाठी मनोहर शिवराम बाविस्कर (वय 45) यांना सकाळी निमखेडी शिवारातुन वाळु वाहतुक करतांना एक ट्रॅक्टर दिसुन आले. बाविस्कर यांनी ट्रॅक्टर थांबवून चालकाला वाळूबाबत विचारणा केली. यावेळीस चालकाने स्वतःचे नाव संजय राजेंद्र राठोड सांगत पावती नसल्याचे सांगितले. यावरुन तलाठ्यांना राठोड याने ट्रॅक्टर तलाठ्यावर चालविण्याची धमकी दिली.
प्रांताधिकार्यांच्या कानउघाडणीनंतर गुन्हा
वाळूचालकांकडून तलाठी बाविस्कर हे तालुका पोलीसांत गुन्हा दाखल करण्यासाठी गेले. यावेळी शासकिय कामात अडथळा केल्याप्रकरणी प्राणघातक हल्ला करुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी बाविस्कर यांनी केली. मात्र पोलीसांनी वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरु होत्या. त्याचवेळी मनोहर बाविस्कर यांनी प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी जलज शर्मा यांना फोन करुन घडलेला प्रकार सांगितला. पोलीसांनी घेतलेली भुमिकाही तलाठी बाविस्कर यांनी प्रांताधिकार्यांसमोर मांडली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जलज शर्मा यांनी पोलीसांशी संपर्क साधला. यानंतर पोलीसांनी भाग 5 गुरनं.33/2017 नुसार भादंवि कलम 307, 353, 379, 506 सह मोटार व्हेयिकल ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोनि. सुर्यकांत पाटील करीत आहेत.
तलाठ्यास टॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न
तलाठी ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.19 ए.टी.9407 ला असलेल्या विनानंबरची ट्रॉलीमध्ये सुमारे 2 हजार रुपये किंमतीची वाळू होती. वाळूची पाहणी करीत असतांना तलाठी बाविस्कर ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या मधोमध उभे होते. याठिकाणीच ट्रॅक्टरच्या मोठ्या टायराखाली आणून चिरडण्याच्या उद्देशाने चालक राठोड याने ट्रॅक्टर वळविले. प्रसंगावधानामूळे तलाठी बालंबाल बचाविले. ही घटना हिराशिवा चौकातील गजानन न्हावी यांच्या सुलूनच्या दुकानासमोर घडली. यामुळे अवैध वाळू वाहतुकदारांची मुजोरी थांबेल का? असा सवाल देखील सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
अवैधरित्या वाळूची उचल
महसुल, पोलीस व आरटीओ विभागाकडून होणार्या कारवाईच्या निषेधार्थ जिल्ह्यात बेमुदत वाळू वाहतुक बंद ठेवण्याचा निर्णय शनिवारी वाळू वाहतुकदारांच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यामूळे वाळू वाहतुक बंद असतांना निमखेडी शिवारातुन वाळू वाहतुक कशी केली गेली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाळूने भरलेली वाहने भरधाव वेगाने चालवुन लोकांच्या जीवावर ती उठत आहेत. निमखेडी शिवारातुन वाळू वाहतुक करणार्या डंपरमूळे दक्ष या चिमुकल्याचा बळी गेला. आणि आज चक्क तलाठी यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालुन जीवे मारण्याचा उद्देशाने प्रयत्न झाला.