तळजाई टेकडीवरील वृक्षतोड थांबवा

0
नगरसेवक जगताप यांची मागणी
पुणे : तळजाई टेकडी येथे क्रिकेट मैदानालगत वाहनतळ उभारणीसाठी ३०० झाडे तोडली जाणार आहेत. ही वृक्षतोड ताबडतोब थांबवा अशी मागणी नगरसेवक सुभाष जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
तळजाई टेकडीवर वृक्षगणनेसाठी ठेकेदाराची माणसे गुरुवारी दुपारी आल्यानंतर वृक्षतोड होणार असल्याचे उघड झाले. त्यावेळी नगरसेवक जगताप आणि नगरसेवक प्रकाश कदम यांनी त्या माणसांना पिटाळून लावले.
सौर प्रकल्पाच्या माध्यमातून क्रिकेट मैदानालगत वाहनतळ करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. याकरिता ३०० झाडे तोडण्याची योजना आहे. या संभाव्य वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांचाही विरोध आहे .टेकडी परिसरात कोट्यावधी रुपये खर्चून पालिकेनेच झाडे लावून त्यांचे जतन केले आहे. याठिकाणी दीड किलोमीटरचा रस्ता असून वाहनतळासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. त्यासाठी ३०० झाडे तोडण्याची गरज नाही असे जगताप यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
माजी अतिरिक्त आयुक्त शीतल तेली यांनी वृक्षतोड करून वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला होता. त्यांची अचानक बदली करण्यात आली. ही बदली होताच वाहनतळाचा प्रकल्प निविदा मंजूर झाल्या. यामुळे वृक्षतोड प्रकार संशयास्पद झाला आहे. ही टेकडी भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या मतदारसंघात येते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.