देहूरोड : देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर्यांचे सत्र सुरूच आहे. तळवडे येथील एका वर्कशॉपच्या बंद दाराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्याने किंमती ऐवज लंपास केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. ही घटना पहाटे अडीच-तीनच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे. देहूरोड पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
पलास जितेंद्र वायकर (वय 25, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. वायकर यांचा तळवडे येथे कुणाल इंजिनियर्स कंपनी नावाचा लघुउद्योग आहे. नेहमीप्रमाणे ते मंगळवारी रात्री कंपनी बंद झाल्यावर कुलूप लावून घरी गेले. आज सकाळी कंपनीच्यादाराचा दरवाजा कडीकोयंडा उचकटलेला आणि उघड्या स्थितीत आढळुन आल्यामुळे त्यांना चोरी झाल्याचा संशय आला. त्यांनी या घटनेची माहिती पोलीसांना कळविल. छोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी आत पाहिले असता, कंपनीतील 15 हजाराचा टीव्ही संच,20 हजारांचा लॅपटॉप, चांदीची गणेश मुर्ती आणि महालक्ष्मीची नाणी तसेच सुमारे 35 हजार किंमतीचे यंत्रांचे सुटे भाग असा सुमारे 70 हजार किंमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले.