बर्याच वर्षांपासून रखडला आहे प्रकल्प : अनेकदा झाला पाठपुरावा
आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत झाली बैठक
पिंपरी-चिंचवड : मागील अनेक वर्षापासून तळवडे येथील डिअर सफारी पार्क चे रखडले आहे. यासाठी स्थानिक आमदार ते नगरसेवक पाठपुरावा करत आहेत. मात्र आतापर्यंत विविध विषयावरून हा प्रकल्प रखडला आहे. हा प्रकल्प लवकरात-लवकर मार्गी लावण्यासाठी अनेक वेळा नगरसेवकांनी पाठपुरावा केला आहे. नुकतेच 13 जून रोजी आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी राम किशोर नवल, आयुक्त श्रावण हार्डीकर, यांच्यासोबत अनेक अधिकारी उपस्थित होते. हा प्रकल्प लवकर होण्यासाठी अधिकारी सकारात्मक असल्याचे आ.लांडगे यांनी सांगितले.
58 एकर जागा आरक्षित
सिंगापूर येथील जगप्रसिध्द जुरॉग बर्ड पार्कच्या धर्तीवर हे पक्षी उद्यान असणार आहे. 58 एकर जागेत पक्षीउद्यान उभारण्याचे नियोजन आहे. सफारी पार्कचा प्रकल्प तळवडे येथील गट 1 ब मध्ये 23.3 हेक्टर म्हणजेच सुमारे 58 एकर क्षेत्रामध्ये आरक्षण क्रमांक 1/12 आणि 1/53 मध्ये हरीण उद्याण आणि प्राणी संग्रहालयासाठी आरक्षित असून, महापालिकेने 14 जुलै 2015 मध्ये महापालिकेने मागणी केली आहे. त्यानुसार 6 मे 2017 रोजी शासनाकडे या प्रकल्पासाठी 66 कोटी 90 लाख रूपये जमा असल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयातून महापालिकेला देण्यात आले आहे. मात्र महापालिकेने 3 जून 2017 रोजी जागेचे प्रयोजन सार्वजनिक हिताचे असल्याने नाममात्र एक रुपया दराने जागा हस्तांतरीत करण्याबाबतचे पत्र पाठविले आहे. त्यानुसार प्रकल्पाच्या कामाची पुढीस कार्यवाही सुरु आहे.
जागा अडकली रेडझोनमध्ये
प्रकल्प साकारण्यासाठी शासन स्तरावर काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. रेडझोनमध्ये या प्रकल्पाची जागा असल्याने हा प्रकल्प कसा साकारायचा किंवा प्रकल्प झाल्यानंतर काय धोके निर्माण होऊ शकतात यावर जिल्हाधिकारी, आमदार, तहसीलदार आणि इतर अधिकार्यांमध्ये चर्चा झाली. या प्रकल्पासंदर्भात महापालिकेकडून सर्व कामे पूर्ण झाली आहेत. मात्र शासनस्तरावरची कामे प्रलंबित आहेत. हा प्रकल्प साकारण्यासाठी मागील काही महिन्यांपूर्वी नागरिकांच्या संकल्पना आणि अभिप्राय मागविण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी या प्रकल्पामध्ये नाईट सफारी पार्क करण्याचा अभिप्राय दिला आहे.
रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार, आयुक्त यांच्यासोबत नुकतीच बैठक पार पडली. त्यामध्ये प्रकल्पासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे. शासनस्तरावर या प्रकल्पाचे काम थांबले असून, त्याचा पाठपुरावा आपण करणार आहोत. तसेच मोशी-चर्होली येथील गायरानाची जागा सफारी पार्कच्या दृष्टीकोनातून चांगली आहे. त्यामुळे या जागेची पाहणी यावेळी कऱण्यात आली. पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी डी.पी.आर तयार कऱण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-आमदार महेश लांडगे
या प्रकल्पाची मागणी 2015 मध्ये महापालिकेने केली होती. तेव्हापासून अद्याप या कामांत काहीच गती नाही. त्यामुळे उत्सुकता मावळत चालली आहे. याचा पाठपुरावा राष्ट्रवादीच्या कार्यकाळापासून सुरु आहे. मात्र हा प्रश्न शासनस्तरावर रखडल्याने वेळ लागतो आहे. या आंतरराष्ट्रीय प्रकल्पामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात-लवकर कसा मार्गी लावता येईल यासाठी आमदारांनी सकारात्मक प्रयत्न करावेत.
-नगरसेवक प्रविण भालेकर
तळवडे गावासाठी प्रकल्प खूप महत्त्वाचा आणि अभिमानाचा आहे. या प्रकल्पासंदर्भात खूप वर्षापासून फक्त ऐकतो आहे. हा प्रकल्प तडीस लागेपर्यंत या प्रकल्पाच्या जागेत गावाकडील बाजूस एक उद्यान विकसित करावे, यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल. या प्रकल्पासाठी बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना उद्यान विकसित केल्यावर सुखसुविधा मिळतील.
-नगरसेवक पंकज भालेकर