तळवेल ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांचे राजीनामे

0

वरणगाव । भुसावळ तालुक्यातील तळवेल हे गाव भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. याठिकाणी भाजपा वगळता कोणताही पक्ष सत्ता स्थापन करू शकत नाही मात्र सरपंच काही सदस्यांना विश्वासात घेत नसल्याने सरपंचाच्या हुकूमशाहीला कंटाळून ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांनी राजीनामा दिल्याने गावात खळबळ उडाली आहे.

इतरही सदस्य देणार राजीनामे?
सद्यस्थितीत असलेल्या ग्रामपंचायत कार्यकारणीचा 27 नोव्हेंबर 2012 रोजी निवडणूक होवून कार्यभार सांभाळला होता. त्यावेळी 13 सदस्यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानदेव झोपे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत तळवेल येथे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून विविध योजना राबवून विकासकामांचा झपाटा लावण्यात आला होता. मात्र विकास कामाची हवा सरपंच ज्ञानदेव झोपे यांच्या डोक्यात गेल्याने हुकूमशाही पध्दत वापरुन स्वतः निर्णय घेत असतात. त्यामुळे शुक्रवार 31 रोजी ग्रामपंचायत सदस्य गजानन राणे व सदस्या वर्षा पाटील यांनी सरपंचाच्या कामकाजाला कंटाळून त्यांच्याकडेच राजीनामे दिले आहे. तसेच काही सदस्य सुध्दा राजीनामे देण्याच्या तयारीत आहे. सदस्या शारदा पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार सरपंचासह काही सदस्य ग्रामस्थांसंबंधी विज वितरण कार्यालयाचे अधिकारी व कर्मचार्‍यांना काहीही कारण सांगून ग्राहकाचे विज कनेक्शन बंद करा किंवा त्यांना जाणुनबुजून त्रास देण्याचे काम करीत असल्याने सदस्यपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहे, असे शारदा पाटील यांनी सांगीतले. 29 रोजी ग्रामपंचायतीच्या बैठकीत गावातील रामनवमी यात्रेसदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतमधील सदस्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याने ग्रामपंचायतीच्या सदस्यांमध्ये नाराजीचा सुर उमटला असून काही सदस्य राजीनामा देण्याच्या तयारीत आहे.