तळागाळातील घटकांच्या कल्याणासाठी योजना अभियान म्हणून राबवा!

0

धुळे । समाजातील तळागाळातील घटकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी त्या अभियान म्हणून राबवाव्यात, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी येथे केले. केंद्र सरकारने 14 एप्रिल ते 5 मे या कालावधीत ग्रामस्वराज्य अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत शनिवार, 28 रोजी ग्रामस्वराज्य दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अरविंद मोरे उपस्थित होते. यावेळी लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या घरकुलांचे कार्यारंभ आदेश वितरीत करण्यात आले, तर घरकूल पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना घराची किल्ली देण्यात आली.

प्रभावीपणे अंमलबजावणी करावी…
जिल्ह्यात 6 हजार 466 घरकुलांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी सहा हजार 433 घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी बारा लाभार्थ्यांनी पाच महिन्यात घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले. त्यांचे काम अभिनंदनीय आहे. रमाई आवास योजना व शबरी आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असेही मंत्री डॉ. भामरे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गंगाथरण म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गतचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजनबध्द कार्यक्रम आखण्यात आला आहे. प्रधानमंत्री सौभाग्य योजनेतून प्रत्येक घरात विद्युतीकरण करण्याचे ध्येय आहे. यावेळी लाभार्थ्यांपैकी नांद्रे येथील शिवाजी भिल, कुलथे येथील दादा नवगिरे, धाडरे येथील सुरेश दिलीप सोनवणे, जुनवणे येथील अनिल शंकर वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गंगाथरण यांनी तर सुत्रसंचालन सांख्यिकी विस्तार अधिकारी श्री. थोरात यांनी केले.

योजनेची दिली माहिती
पुढे बोलतांना ना. डॉ. भामरे म्हणाले, 2019 अखेर प्रत्येक गरिबाला घरकूल उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा निश्‍चय आहे. प्रधानमंत्री आवास योजना 2016- 2017 मध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्याला 269 चौरस फूट घरकुलासाठी एक लाख 20 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. हा निधी पाच हप्त्यात दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त लाभार्थ्याने 90 दिवस मनुष्य दिनाचे काम केले असेल, तर 18 हजार रुपये, तर शौचालयासाठी 12 हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे.