शिवतेज मित्र मंडळाने अनोखा उपक्रम
शेलपिंपळगाव । आळंदी येथील महाद्वार रोडवरील 40 वर्षांपुर्वी स्थापन झालेल्या शिवतेज मित्र मंडळाने अनोखा उपक्रम राबवला. गणेशोत्सव काळात नियमित होणार्या गणरायाच्या आरतीसाठी समाजातील अगदी तळागाळातील व्यक्तींना आरतीचा मान देण्याची संकल्पना या मंडळाने राबवली आहे. त्याअंतर्गत कचरा वाहून नेणार्या वाहनाचे चालक आणि पत्रकार यांच्या हस्ते आरतीचा कार्यक्रम केला.
हे मंडळ नेहमीच सामाजिक, शैक्षणिक धार्मिक, कला-क्रिडा क्षेत्रात अग्रणी असून, गणेशोत्सवाबरोबरच वर्षभर निरनिराळे सामाजिक उपक्रम राबवित आहेत. या मंडळाचे खास वैशिष्ट्य असे की, गेल्या 30 वर्षांपासून अध्यक्ष म्हणून आळंदी नगरपालिकेचे माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे हे कार्यभार सांभाळीत आहेत. सोमवारी (दि.28) आळंदी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात कचरा वाहून नेणार्या वाहनावर गेली 40 वर्षे चालक म्हणून काम करणारे व आजवर नागरिकांचे आरोग्य आबाधित ठेवणारे माऊली जाधव व आळंदीच्या जडणडणीत पत्रकारितेच्या माध्यमातून गेली 30 वर्षे नागरिकांच्या विविध समस्यांना वाचा फोडणारे व लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाणारे महादेव पाखरे यांना आरतीचा मान दिला. त्याचबरोबर श्रींच्या आरतीचा मान दिलेल्या मान्यवर व्यक्तींना रोपटे भेट देऊन पर्यावरणाचा संदेश दिला.
यंदापासून समाजातील तळागाळातील व्यक्तींना, वंचित मुले, पालिका अधिकारी आदी क्षेत्रातील मंडळींचा यंदापासून आरतीचा मान देण्यात येईल असे, मंडळाचे अध्यक्ष आनंदराव मुंगसे यांनी सांगितले.