तळीयेमधील बेपत्ता लोकांना मृत घोषित करा : ग्रामस्थांची मागणी

महाड : तळीये इथे दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, रविवारी ढिगाऱ्याखाली अडकलेले ११ मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र, अजूनही ३१ मृतदेह त्याच ठिकाणी असल्याची भीती वर्तवली जात आहे. आता या मृतदेहांना हात लावू नका, त्यांना मृत घोषित करा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. २२ जुलैला दुपारी ४ वाजताच्या सुमारास महाडच्या तळीये गावात दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली ३५ घरे दबली गेली. दरडीखाली दबलेले ४९ जणांचे मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आलं होतं. मात्र, त्यानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेऊन आतापर्यंत ८५ मृतदेह बाहेर काढले. मात्र, अजूनही ३१ नागरिक बेपत्ता आहेत. तळीयेमध्ये मृतदेह बाहेर काढताना कोणाचे हात तर कोणाचे पाय अशा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडत होते. त्यामुळे बचाव कार्य थांबवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.

गावचे सरपंच संपत चांदेकर म्हणाले की, आता या मृतदेहांचं विघटन सुरु झाल्यामुळे त्यांना बाहेर काढणं आणखी कठीण होणार आहे. ते पाहून त्यांच्या नातेवाईकांना अधिकच दुःख आणि वेदना होतील. त्यामुळे त्यांना बाहेर न काढणंच योग्य असल्याची भावना मृतांच्या नातेवाईकांनीही व्यक्त केली आहे. गावातले लोकप्रतिनिधी आणि मृतांच्या नातेवाईकांनी आता मृतदेहांची अधिक विटंबना न करता त्यांना मृत घोषित करुन मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर दस्ताऐवजांची पूर्तता शासनाने करावी अशी मागणी केली आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी बचाव आणि मदतकार्य सुरुच ठेवण्याची भूमिका घेतली आहे. गावातल्या सगळ्या नागरिकांनी जरी विरोध केला तरी हे काम सुरुच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एकूण एक बेपत्ता व्यक्ती जोपर्यंत सापडत नाही, तोपर्यंत हे मदत आणि बचावकार्य सुरुच राहील, अशी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली आहे.