तळेगाव : येथील वन्यजीव छायाचित्रकार अभय तुळशीराम केवट यांनी आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रतियोगितेत सुवर्णपदक मिळविले आहे. त्यामुळे तळेगावकर्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. फोटोग्राफीक सोसायटी ऑफ अमेरिका, फेडरेशन इंटरनॅशनल दि आर्ट फोटोग्राफीक, फेडरेशन ऑफ इंडियन फोटोग्राफी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या वन्यजीव छायाचित्रण स्पर्धेत अभय केवट यांनी हे यश संपादन केले. या स्पर्धेत 39 देशांच्या 300 हून अधिक छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता. या छायाचित्रकारांनी सुमारे 1600 वेगवेगळी छायाचित्रे या स्पर्धेत पाठविली होती.
चारही छायाचित्रे ठरली पात्र
या स्पर्धेसाठी अभय यांनी चार छायाचित्रे पाठवली होती. त्यांची चारही छायाचित्रे स्पर्धेसाठी पात्र ठरली. मात्र, त्यातल्या ज्या छायाचित्राने सुवर्णपदक पटकाविले; त्याची कथा मजेशीर आहे. हे छायाचित्र मध्यप्रदेशातील पेंच या अभयारण्यातील आहे. या जंगलात एक 10 ते 12 फूट उंच झाड होते. त्या झाडाच्या ढोलीमध्ये पोपटांचे एक घरटे होते. त्या घरट्यात पोपटाची तीन पिल्ले होती. ती घोरपडीने खाल्ली. परंतु तिचे पोट एवढे फुगले की, ती त्या ढोलीतून बाहेर येऊ शकत नव्हती. त्यामुळे तिने खाल्लेली ती पिल्ले ओकली. मात्र, तेवढ्या वेळात त्या पिल्लांचे पालक पोपट तेथे आले. त्यांनी त्या घोरपडीला बाहेर काढण्यासाठी तिचा पाय ओढायला सुरुवात केली. तोच क्षण अभय यांनी कॅमेर्यात टिपला. या छायाचित्राला सुवर्णपदक मिळाले आहे.
दिल्लीत छायाचित्रांचे प्रदर्शन
या स्पर्धेचा निकाल 21 मे रोजीच लागला होता. तसेच या छायाचित्रांचे दिल्ली येथे 10 व 11 जुलै रोजी प्रदर्शनही भरले होते. तेव्हा अभय हे पेंच अभयारण्यातच होते. पहाटे तीन वाजता त्यांना मित्राचा फोन आला. त्याने त्यांच्या छायाचित्राने सुवर्णपदक पटकाविल्याची माहिती दिली. मात्र अभय यांना मित्रावर विश्वास बसला नाही. त्यांनी जंगलात असल्यामुळे आधी घरच्या लोकांना ई-मेल तपासण्यास सांगितले. नंतर त्यांच्या पत्नीने ही माहिती त्यांना दिली.